मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकासातील (BDD Chawl Redevelopment ) ज्या दुकानदारांना दुकानाच्या बदल्यात घर हवं असेल त्यांनाही अन्य भाडेकरुंप्रमाणे 500 फुटांचे घर दिले जाईल, अशी हमी म्हाडानं (Mhada) मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. त्यामुळे दुकानाच्या बदल्यात घराची मागणी करणाऱ्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल व न्यायमूर्ती कमल खथा यांच्या खंडपीठासमोर म्हाडाचे वकील मिलिंद साठ्ये आणि प्रकाश लाड यांनी बुधवारी ही हमी दिली. ज्या दुकानदारांना पुनर्विकासात घर हवं आहे त्यांनी तसा अर्ज म्हाडाकडे करावा. त्यांना घर दिले जाईल, असं म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
इतर रहिवाशांप्रमाणे आपल्यालाही 500 चौ. फुटांचंच दुकान मिळायला हवं, अशी मागणी करणारी याचिका बीडीडी चाळ दुकानदार संघानं हायकोर्टात केली आहे.
बीडीडी चाळींचा पुनर्विकास झाला आणि इमारत उभी राहिली तर आमच्या मागणीला काहीच अर्थ राहणार नाही, असं अॅड. अंतुरकर यांनी संघटनेच्यावतीनं हायकोर्टाला सांगितलं. त्याची नोंद घेत हायकोर्टानं ही सुनावणी 7 डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे.
काय आहे प्रकरण :
वरळी, नायगाव, ना.म.जोशी मार्ग व शिवडी येथील बीडीडी चाळीत एकूण 16 हजार घरे आहेत. त्यातील 300 हून अधिक घरांना केवळ दुकानांसाठी परवाना मिळालेला आहे. मात्र आमची जागा निवासी खोलीप्रमाणेच 160 चौ. फुटांची आहे. मात्र पुनर्विकासात आमच्यासोबत दुजाभाव केला जात आहे, असा आरोप करत या दुकानदारांच्या संघटनेनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
घर 500 चौरस फुटांचे, दुकान 160 फुटांचे का?
160 चौरस फुटांच्या घराच्या बदल्यात पुनर्विकासात 500 चौरस फुटांचं घर दिलं जाणार आहे. मात्र आम्हाला 160 चौ. फुटांचाच गाळा दुकानासाठी मिळणार आहे. हे चुकीचं आहे, बीडीडीतील पोलिसांना पुनर्विकासात 500 चौ. फुटांचे घर मिळणार आहे. बीडीडी चाळ परिसरातील झोपडीला पुनर्विकासात 300 चौ. फुटांचे घर मिळणार आहे. झोपडपट्टीधारक अधिकृत भाडेकरु नसतानाही त्यांना 300 फुटांचे घर मिळत आहे. त्यामुळे आम्हालाही 500 चौ. फुटांचं दुकान पुनर्विकासात मिळायला हवं, अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
बीडीडी चाळींचा इतिहास ( History Of BDD Chawl)
सन 1920 ते 1924 या कालावधीत औद्योगिकरणामुळं शहरी भागांतून घरांची कमतरता प्रामुख्यानं जाणवू लागली. त्यामुळे मुंबई प्रोव्हिन्शिअल राज्याचे तत्कालीन राज्यपाल सर जॉर्ज लॉइड यांनी बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच, बीडीडीची स्थापना करून मुंबई शहरात गृहनिर्मितीची योजना तयार केली.
या योजनेअंतर्गत वरळी, एन. एम. जोशी मार्ग परळ, नायगाव आणि शिवडी येथे सुमारे 92 एकर जागेवर बीडीडी चाळींची उभारणी करण्यात आली. या चाळींमध्ये औद्योगिक कामगार आणि गिरणी कामगार वर्ग प्रामुख्याने राहू लागला. 100 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बीडीडी चाळींमध्ये तर अनेक साहित्यिक, राजकीय नेते, कलाकार अशी अनेक प्रतिष्ठित महापुरुष वास्तव्यास होते. तसेच मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा सर्वात मोठा वाटा आहे.