मुंबई : अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात अटकेत असलेले निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना आता पोलीस सेवेतून काढण्याची प्रक्रिया मुंबई पोलिसांनी सुरु केली आहे. सचिन वाझेविरोधात भारतीय संविधान, 1949 च्या कलम 311 अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.ा


सूत्रांच्या माहितीनुसार अँटिलिया स्फोटकं प्रकरणात एनआयएने सचिन वाझेंन अटक केल्यानंतर ही प्रक्रिया सुरु झाली. सचिन वाझेंची अखेरची पोस्टिंग स्पेशल ब्रान्चमध्ये झाली होती, त्यामुळे ही प्रक्रिया संबंधित विभागाची जबाबदारी आहे, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. 


काही दिवसांपूर्वीच स्पेशल ब्रान्चचे अतिरिक्त आयुक्त सुनील कोल्हे यांनी महाराष्ट्र एटीएस आणि एनआयएला पत्र लिहून सचिन वाझेंच्या या प्रकरणातील समावेशासंबंधित दस्तऐवजांची मागणी केली होती, ज्याच एफआयआर कॉपीचाही उल्लेख होता.


हे दस्तऐवज सोमवारीच (12 एप्रिल) स्पेशल ब्रान्चला सोपवण्यात आले आहेत. यानंतर आता स्पेशल ब्रान्चचे अधिकारी यावर आपला अहवाल बनवून राज्य सरकारला सोपवतील आणि वाझेंवर भारतीय संविधानाच्या कलम 311 अंतर्गत कारवाई करण्याची परवानगी मागतील.


एनआयएच्या अधिकाऱ्यांनी एबीपीला माहिती देताना सांगितलं की, आम्ही सचिन वाझेशी संबंधित एक अहवाल मुंबई पोलिसांना दिला आहे.


मुंबई पोलिसातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, आम्हाला प्रत्येक ठिकाणचा अहवाल मिळाला आहे, जो आम्ही आता लीगल सेलला पाठवू आणि पुढील प्रक्रिया सुरु केली जाईल. जर सचिन वाझेविरोधात दिलेल्या अहवालाशी सरकार सहमत असेल तर त्यांना सेवेतून काढलं जाईल.


या प्रक्रियेशिवाय देखील मुंबई क्राईम ब्रान्चने अंतर्गत समिती तयार केली आहे. ज्यात त्यांना समजलं की, वाझेंनी अनेक जणांकडून लाच घेतली आहे आणि या लोकांची नावं टीआरपी घोटाळा, फेक फॉलोअर्स, फेक कॉल सेंटर, क्रिकेट बेटिंग आणि दिलीप छाब्रिया प्रकरणांत आलं होतं. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणांचा तपास सीआययूचं पथक करत होतं आणि सचिन वाझे सीआययूचे इन्चार्ज होते.


ईडी टीआरपी घोटाळ्यात मनी लॉड्रिंगच्या दृष्टीने तपास करत आहे. ईडीलाही तपासात समजलं होतं की, सचिन वाझेंनी BARC च्या लोकांकडून 30 लाख रुपये घेतले होते. ईडी देखील आपला अहवाल महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरोला सोपवणार आहे, जेणेकरुन वाझेंविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत कारवाई करता येऊ शकते.