Bandra Terminus Stampede : दिवाळी आणि छटपूजेसाठी मुंबईतून यूपीमध्ये (उत्तर प्रदेश) निघालेल्या प्रवाशांवर रविवारी पहाटे 'संक्रांत' ओढावली. वांद्रे स्थानकातून सुटणाऱ्या गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली आणि या गर्दीमुळे चेंगराचेंगरी (Bandra Terminus Stampede) होऊन 9 प्रवासी जखमी झाले. यात गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी एका तरुणाने आपला पाय गमावला. दिवाळी आहे, घरी जाऊया आणि सण साजरा करुया असं म्हणत गावी निघालेल्या इंद्रजीत सहानीवर (वय 19) अपघातामुळे पाय गमावण्याची वेळ आली.


जखमी इंद्रजीतवर पाय गमावण्याची वेळ


इंद्रजीत विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे कंत्राटदारांकडे टाईल्स बसवण्याचं काम करतो. दिवाळीनिमित्त तो रविवारी पहाटे 5:15 वाजताच्या गाडीने गावाला जाण्यासाठी निघाला होता. मात्र, गाडी पकडण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत त्याच्या पायाला मार बसला. गर्दीतून बाहेर पडण्यासाठी त्याने प्रयत्न देखील केले मात्र, लोक त्याच्या अंगावरून जात होते. त्यामुळे, तो गंभीर जखमी झाला.


केईएम रुग्णालयात शस्त्रक्रिया


इंद्रजितवर केईएम रुग्णालयात रविवारी दुपारी शस्त्रक्रिया करण्यात आली. इंद्रजीतचा पाय मांडीमध्ये मोडला असून त्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. पायाच्या रक्तवाहिन्या जोडल्या न गेल्यास पाय कापावा लागू शकतो, असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.


चेंगराचेंगरी नेमकी झाली कशी?


रविवारी सकाळी सव्वा पाच वाजता वांद्रे टर्मिनस ते गोरखपूर जाण्यासाठी अंत्योदय एक्सप्रेस सुटणार होती. ही ट्रेन पूर्णतः अनारक्षित असते, त्यामुळे या ट्रेनमधून जाण्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर एकवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दिवाळी असल्याकारणाने उत्तर भारतात जाण्यासाठी उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात ट्रेनने प्रवास करत होते. अंदाजे अडीच हजार लोक या एका ट्रेनसाठी प्लॅटफॉर्म नंबर एकवर जमले होते. ट्रेन सुटण्याच्या बरोबर दोन तास आधी अंदाजे 2 वाजून 45 मिनिटांनी रिकामी 22 डब्यांची ट्रेन प्लॅटफॉर्मवर लागत होती.


गाडीचे 16 डबे प्लॅटफॉर्मवर आले होते, त्यामुळे गाडीचा वेग अतिशय कमी करण्यात आला. त्याचवेळी या गाडीमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी दरवाजावर लटकण्यास सुरुवात केली. त्यात एका प्रवाशाने एमर्जन्सी खिडकीमधून आत मध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला, हे पाहून इतर प्रवाशांनी देखील त्या खिडकीतून तसंच दरवाजातून आतमध्ये जाण्यासाठी गाडीच्या एका डब्याजवळ जास्त गर्दी केली. यात गाडी हळूहळू पुढे सरकत होती, त्यामुळे दोन ते तीन जणांचा तोल जाऊन ते खाली पडले आणि इतर प्रवासी त्यांच्यावर पडले. अशाप्रकारे एका मागे एक घटना घडत गेल्या आणि चेंगराचेंगरी झाली, ज्यात 7 जण जखमी, तर दोघे गंभीर जखमी आहेत.


हेही वाचा:


Bandra Terminus : प्लॅटफॉर्म नंबर एक, 2500 लोक, भर रात्री वांद्र्यात रक्ताचा सडा; पावणेतीनच्या चेंगराचेंगरीची इनसाईड स्टोरी!


Bandra Terminus Stampede PHOTOS : वांद्रे स्थानकावर नेमकं काय घडलं? इतकी मोठी चेंगराचेंगरी कशी झाली?