मुंबई: युवासेनेच्या घेरावानंतर वांद्रे पॉलिटेक्नि कॉलेजच्या प्राचार्यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच विद्यार्थ्यांविरोधात पोलिसात दिलेली तक्रारही मागे घेण्यात आली आहे.

मुंबईतील वांद्रे पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्यांना युवासेनेनं आज घेराव घातला. काही दिवसांपूर्वी कॉलेजच्या गेटवर युवासेनेचा एक फलक लावण्यात आला होता. त्यावर कार्यकर्ते म्हणून ४ विद्यार्थ्यांचे छायाचित्र होते. मात्र, विद्यार्थ्यांनी युवासेनेचा फलक  गेटवर लावलाच कसा, असा प्रश्न कॉलेज प्रशासनानं उपस्थित केला.

त्यानंतर विद्यार्थ्यांविरोधात पोलिसात तक्रार देऊन त्यांच्या पालकांना नोटीसाही पाठवल्या होत्या.

त्यानंतर युवासेनेने प्राचार्यांना घेराव घातला. या प्रकरणी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी तसेच विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही, याची लेखी हमी द्यावी अशी मागणी युवा सेनेने केली होती.

दरम्यान, कॉलेजच्या प्राचार्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या दबावामुळे ही कारवाई केली, असा आरोप युवासेनेनं केला आहे.