मुंबई : बालभारतीच्या दुसरीच्या पुस्तकातील संख्यानामावरुन जोरदार टीका आणि विरोध झाल्यानंतर सरकारने यासंदर्भात समिती स्थापन करून निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. दरम्यान संख्यावाचनावरुन सरकारवर मिश्कील टीका करणाऱ्या विरोधकांना आज मुख्यमंत्र्यांनी खास त्यांच्या शैलीत उत्तरही दिलं.


संख्यावाचनाबाबत तज्ज्ञांच्या समितीने शिफारस केली होती, त्यानुसार हा प्रयोग अभ्यासक्रमात करण्यात आला होता. त्यामुळे जे बदल झाले आहेत ते सविस्तर दिलेले आहेत. उदाहरणार्थ पुस्तकात केवळ वीस दोन असं लिहिलं नाही,तर पुढे बावीसही लिहलेले आहे. त्यावर सभागृहाची तीव्र भावना असेल तर अधिक तज्ज्ञांची समिती नेमून त्याबाबत विचार करु, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणपीस यांनी सभागृहात सांगितलं.

संख्यावाचणावरुन विरोधकांनी सरकारची खिल्ली उडवत मिश्किल टीक केली होती. त्यावेळी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना खास शालेय पुस्तकातील वाक्यांचा आधार घेतला. मुख्यमंत्री म्हणाले की, बोलण्यात सुलभता यावी म्हणून संख्यावाचनाचा निर्णय घेण्यात आला. दादा कमळ बघ, छगन कमळ बघ, हसन झटकन उठ, शरद गवत आण, हे पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकात हे उतारे आहेत. या उदाहरणाचा कोणत्याही सदस्यांशी संबंध नाही

बालभारतीच्या दुसरी इयत्तेतील गणिताच्या पुस्तकात बदल करण्यात आले आहेत. 21 ते 99 हे आकडे आता यापुढे जोडाक्षराप्रमाणे नाही तर संख्यावाचनाप्रमाणे शिक्षकांनी शिकवायचे आहेत. म्हणजेच 32 आकडा हा थेट बत्तीस असा उल्लेख न करता तीस आणि दोन असं विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे.

जोडाक्षरामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असून गणिताची नावड निर्माण होत असल्याचं बालभारतीचं म्हणणं आहे. शिवाय इंग्रजीसोबतच कानडी, तेलगू, तामिळ भाषांमध्येही अशाच प्रमाणे शिक्षण होत असल्याचं बालभारतीनं सांगितलं आहे.

VIDEO | बदलत्या संख्यावाचनाने गणित खरंच सोपं होईल? मंगला नारळीकरांशी बातचीत