Baldapur Jambhul News: मुंबई आणि उपनगरात (Mumbai News) प्रसिद्ध असलेले मात्र नागरिकरणाच्या रेट्यात गेल्या काही वर्षात नामशेष होत चाललेल्या बदलापूरच्या जांभळाला (Baldapur Jambhul) नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न बदलापुरात सुरू झाला. जांभळाला भरभराटीचे दिवस आणि भौगोलिक नामांकन देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात एक आशादायक माहिती समोर आली आहे. भाभा अणूशक्ती संशोधन संस्थेच्या (Homi Bhabha Centre For Science Education) अहवालात बदलापुराच्या जांभळात अँथोसायनीन आणि अँन्टी ऑक्सिडंट आढळून आले आहे. त्यामुळे हे जांभूळ गुणवत्तापूर्ण मानले जाते आहे.


बदलापूर शहर आणि आसपासच्या गावात जांभळाच्या जातीचे पाच प्रकार


बदलापूर शहर आणि आसपासच्या गावात मिळणाऱ्या जांभळाच्या जातीचे पाच प्रकार भाभा अणूशक्ती संशोधन केंद्रात पाठवण्यात आले होते. केंद्राच्या अन्न तंत्रज्ञान विभागात या जांभळांच्या दर्जाची तपासणी करण्यात आली. यात गरवी प्रकारातील जांभूळ मांजर्ली, वालिवली, बोराडपाडा आणि कोंडेश्वर परिसरातून संकलित करण्यात आले होते. या जांभळांच्या भौतिक, जैवरसायन आणि अँन्टी ऑक्सिडंट अशा तीन पातळ्यांवर त्याची तपासणी करण्यात आली होती. 


जांभळाचा रंग अधिक गडद असल्याचे निरीक्षण नोंदवलं


याचा पहिला अहवाल नुकताच यासाठी काम करणाऱ्या जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टला प्राप्त झाला. या अहवालानुसार या जांभळामध्ये ‘अँथोसायनीन’ चे प्रमाण अधिक असल्याचे समोर आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आदित्य गोळे यांनी दिली आहे. यामुळे जांभळाचा रंग अधिक गडद असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. सोबतच या जांभळाच्या प्रजातीमध्ये अँन्टी ऑक्सिडंटही असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आंबट आणि गोट अशी मिश्र चव असलेले हे जांभूळ अँन्टी ऑक्सिडंटमुळे आल्हाददायक लागते. त्यामुळे पहिल्याच अहवालात जांभळाची गुणवत्ता समोर आल्याने यासाठी प्रयत्न करणाऱ्या स्वयंसेवकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


भौगोलिक मानांकच्या दिशेने पुढचे पाऊल


बदलापूर शहरातील कमी होत चाललेल्या या बदलापुरच्या जांभळाला जुने स्थान मिळवून देण्यासाठी जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी भाभा अणूशक्ती संशोधन केंद्राची मदत घेतली जाते आहे. बदलापूर आणइ आसपासच्या भागात एक हजार 250 झाडे आहेत. पर्यावरणप्रेमींनी एकत्र सुमारे दोन हजार रोपे तयार केली असून लागवडीसाठी तयारी सुरू आहे. जांभळाच्या भौगोलिक मानांकन प्रक्रियेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 21 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जांभळाच्या या अहवालानंतर हे भौगोलिक मानांकनाच्या प्रक्रियेत एक पाऊल पुढे गेले आहे.