पालिकेने सीएसएमटी येथील हिमालय या पुलाच्या ऑडिटचे काम दिलीपकुमार देसाई यांच्या जेडी कन्सल्टंट या कंपनीला दिलं होतं. परंतु पालिकेने या कंपनीची कोणत्याही प्रकारची माहिती घेतली नव्हती, हे स्पष्ट झाले आहे. पालिकेने या कंपनीच्या मागील कामांचा अनुभवही पाहिला नव्हता, तरीदेखील या कंपनीना ऑडिटचे काम दिल्याने पालिकेच्या कामावर संशय निर्माण झाला आहे.
पुलाच्या ऑडिटचे काम साध्या कंपनीला देऊन जास्तीत जास्त पैसे स्वतःच्या खिशात घालण्याचा प्रयत्न पालिका अधिकाऱ्यांनी केला होता, अशी चर्चादेखील सुरु आहे. पालिकेचा पुलाच्या ऑडिटच्या कामात धांदलपणा आणि बेजबाबदारपणा दिसत आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पूल दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर पालिकेचे आयुक्त अजॉय मेहतांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. युनायटेड काँग्रेस अलायन्सने आयुक्तांनी भेट द्यावी यासाठी आंदोलन केले. परंतु आयुक्त पालिकेत नसल्याची माहिती दिली गेली.
गुरुवारी (14 मार्च)छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाली. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण गंभीर जखमी झाले होते.