मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाली आहे. मात्र जालनामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना आमदार अर्जून खोतकर यांच्यातील वाद संपता संपत नाही. आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे, महिला आणि बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर यांच्यात प्राथमिक बैठक पार पडली.
जालन्यातील जागेवर आजच्या बैठकीत अंतिम तोडगा निघणार नसल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलं होत. मराठवाड्यातील युतीच्या समन्वयकाची जबाबदारी पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता खोतकर-दानवे वाद मिटवण्यासाठी पंकजा मुंडे समन्वयकाच्या भूमिकेत असल्याचं बोललं जात आहे.
मात्र उद्या शिवसेना भाजप युतीचा दुसरा मेळावा औरंगाबादमध्ये पार पडणार आहे. त्याआधी रामा हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात होणार बैठक आहे. या बैठकीत जालनाच्या वादावर पडदा पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
काँग्रेसमध्ये जाण्याबाबत अजून निर्णय नाही
मी आजच्या बैठकीत उद्धव ठाकरेंसमोर प्रस्ताव ठेवले आहेत. जालन्यात एक तर मैत्रीपूर्ण लढत व्हावी किंवा जालना शिवसेनेला सुटावी. जालन्याची जागा शिवसेना निश्चित जिंकून येईल, हा विश्वास मला आहे आणि हे मी उद्धव ठाकरेंना पटवून दिले आहे. पंकजा मुंडे समन्वयक म्हणून आज बैठकीला आल्या होत्या. काँग्रेसमध्ये जाण्याबाबत अजून निर्णय नाही. उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यात औरंगाबादमध्ये गुप्त चर्चा झाली होती. या भेटीनंतर दोन दिवसात अर्जुन खोतकर यांच्याबद्दल गूडन्यूज मिळेल, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे खोतकर काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.
आपण निवडणूक लढण्यास तयार असल्याचं खोतकरांनी आधीच म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंचा जो निर्णय असेल तो आपल्याला मान्य असेल. उद्धव ठाकरे माझ्या हिताचाच निर्णय घेतील असं अर्जुन खोतकर आधीपासून म्हणत आहेत.
खोतकर आणि दानवे यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी बैठकांवर बैठका होत आहेत. मात्र त्याला अद्याप यश मिळालेलं नाही. त्यामुळे जालन्यातून नेमकं कोण लढणार हा प्रश्न सुटला नसल्याचं दिसत आहे.
संबंधित बातम्या
अर्जुन खोतकरांबद्दल दोन दिवसात गुड न्यूज मिळेल, काँग्रेस नेते अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट
मी अद्यापही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास निवडणूक लढणार : अर्जुन खोतकर
जालन्याचा तिढा सुटला, दानवेच उमेदवार; ईशान्य मुंबईचं काय होणार?