उल्हासनगर : मनसेच्या विद्यार्थी सेनेचे उल्हासनगर शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्यावर आज अंबरनाथमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शेलार हे बालंबाल बचावले असले, तरी त्यांच्या हाताला मोठी दुखापत झाली आहे. या हल्ल्याप्रकरणी चार अज्ञातांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यामागे उल्हासनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय शेलार यांनी व्यक्त केला आहे.


मनोज शेलार हे दररोज सकाळी अंबरनाथच्या शिवमंदिर परिसरातील गोविंद पूल भागात मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. गुरुवारी (8 ऑक्टोबर) सकाळी ते मॉर्निंग वॉक करत असताना त्यांच्या पाठीमागून दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी शेलार यांच्या मानेवर तलवारीने घाव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूचे लोक ओरडल्याने शेलार सतर्क झाले आणि त्यांनी हातमध्ये घातल्याने मानेऐवजी त्यांच्या हाताला दुखापत झाली. यावेळी तिथल्या लोकांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोर तलवारीचा धाक दाखवत पळून गेले.


उल्हासनगरच्या मनविसे शहराध्यक्षांवर हल्ला, अंबरनाथच्या शिवमंदिर परिसरात तलवारीने वार


हे हल्लेखोर दोन ते तीन दिवसांपासून आपल्या मागावर असल्याची आणि एकदा त्यांनी आपल्याला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवल्याची माहिती शेलार यांनी पोलिसांना दिली आहे. तसंच आपण उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण मंडळ आणि मालमत्ता विभागाचे अनेक घोटाळे बाहेर काढत असल्याने उल्हासनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा या हल्ल्यामागे हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.


या हल्ल्याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी कलम 307 अन्वये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा केला आहे. हल्ल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि आणि अन्य बाबींच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरु असल्याची माहिती अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांनी दिली आहे.


मुंबई : मालाडमधील शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या