भाजपचे आमदार पराग अळवणी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे हा विषय उपस्थित केला होता. याला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिले, त्यातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (HMIS) नुसार 2017-18 वर्षात एकूण 4 हजार 185 आणि 2018-19 मध्ये 6 हजार 886 इतक्या बालकांना दमा असल्याचे निदर्शनास आले आहे. तर चालू वर्षात मे 2019 च्या अखेर 0 ते 5 वयोगटातील 2401 मुंबईतील बालकांना, पुण्यात 1121, नाशिकमध्ये 387 आणि पालघरमध्ये 485 बालकांना अस्थमा झाले असल्याचे समोर आले आहे.
बालकांमध्ये वाढणार्या दमा रोगाला नियंत्रणात ठेवण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत अंगणवाडीतील 0 ते 6 वयोगट आणि शाळेतील 6 ते 18 वयोगटातील मुला-मुलींची तपासणी करण्यात येते. 2018-19 या वर्षात 0 ते 6 वयोगटातील 60 लाख 73 हजार 542 बालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 23 हजार 233 बालकांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच विविध आरोग्य संस्थांमार्फत अशा बालकांवर उपचार केले जात आहेत.
बालकांच्या मृत्यूच्या प्रमाणातही वाढ
बालकांच्या मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाल्याची माहिती आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. 2016-17 मध्ये 10,348 बालकांचा मृत्यू झाला होता. 2017-18 मध्ये ही आकडे वाढून 13,059 आणि 2018-19 मध्ये 16,539 बालकांचा मृत्यू झाला आहे.
सध्याचा मृत्यू दर 19% आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान मोहीम अंतर्गत अर्भकाचा किंवा बालकांचा मृत्यू दर 10 पर्यंत आणण्याचे उद्धिष्ट फोल ठरल्याचं यातून दिसून येत आहे.