मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी जीवाची बाजी लावत आहे. त्यांच्यासोबत इतर अत्यावश्यक सेवेत काम करणारेही मेहनत घेत आहेत. खेड्यापाड्यात आशा गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचर या देखील जीव धोक्यात घालून काम करतायेत. मात्र, त्यांना हवा तसा मोबदला दिला जात नसल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यांच्या कामाची दखल घेऊन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या आशा गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर यांना प्रत्येकी एक हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.


राज्यातील गावांमध्ये सर्व यंत्रणा जीवाची पर्वा न करता दिवसरात्र कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करीत आहेत. गावपातळीवरील हे कर्मचारी म्हणजे कोरोना विषाणुविरुद्ध लढणारे योद्धेच आहेत. या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण यामध्ये आशा गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर बाकी होते. आता या कर्मचाऱ्यांनाही प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सुमारे 13 हजार 500 आशा गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचरांना याचा लाभ होणार आहे. चालू महिन्यामध्येच या कर्मचाऱ्यांना रकमेचे वाटप करण्याचे निर्देश जिल्हा परिषदांना देण्यात आले असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अकोला, जळगाव जिल्हा दौऱ्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
आतापर्यंत 2 लाख 74 हजार ग्रामीण कर्मचाऱ्यांना रकमेचे वाटप 
राज्यात आतापर्यंत कोरोना रोखण्यासाठी काम करणाऱ्या एकूण 2 लाख 74 हजार इतक्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली आहे. आता राज्यातील आशा गटप्रवर्तक आणि आरोग्य उपकेंद्रांमधील अर्धवेळ स्त्री परिचरांनाही ही प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन
कोरोनाविरुद्ध काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही दिलासा देण्यात आला असून त्यांच्या वेतनासाठी असलेली ग्रामपंचायत करवसुलीची अट रद्द करण्यात आली आहे. यापुर्वी या कर्मचाऱ्यांचे वेतन हे ग्रामपंचायत करवसुलीशी निगडीत होते. पण आता करवसुलीची अट रद्द केल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सन 2020–21 या वर्षात त्यांचे संपूर्ण वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहितीही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

COVID-19 | Ashok Chavan | काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात; रुग्णालयातून डिस्चार्ज