Aryan Khan Drugs Case: वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर सीबीआयनं (CBI) गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खानची मुक्तता करण्यासाठी वानखेडेंनी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागितले होते, शेवटी 18 कोटींना डील पक्की झाली होती, असं सीबीआयनं आपल्या एफआयआरमध्ये (FIR) म्हटलं आहे. वानखेडेंच्या वतीनं किरण गोसावीनं 50 लाखांचं आगाऊ पेमेंटही घेतलं होतं, असाही आरोप सीबीआयनं केला आहे. एवढंच नाही तर महागडी गाडी आणि हाय-फाय ब्रँड्सच्या कपड्यांबद्दल वानखेडेंनी नीट माहिती दिली नाही, तसेच, परदेश दौऱ्याबद्दलही काही बाबी लपवून ठेवल्या असा सीबीआयला संशय आहे.  


एफआयआरनुसार, समीर वानखेडे यांच्या सांगण्यावरून गोसावीनं आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची मागणी केली होती. या रकमेच्या बदल्यात आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवणार नाही, असं आश्वासन देण्यात आलं होतं.


वानखेडेंना चौकशीसाठी समन्स


समीर वानखेडेंना सीबीआयनं समन्स पाठवलं आहे. आपला जबाब नोंदवण्यासाठी त्यांना गुरुवारी, म्हणजेच 18 मे रोजी, नवी दिल्लीतील सीबीआय कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वानखेडे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच आहेत. त्यांच्या जबाबावर सीबीआय समाधानी होते का, ते पाहावं लागेल. 


दरम्यान, आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांचं आणि कॉन्ट्रोव्हर्सी यांचं जुन नातं. डीआरआय ते एनसीबीमध्ये कार्यरत असताना समीर वानखेडे यांचं नाव नेहमीच वादात राहिलं आहे. आता सीबीआयनं आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडें विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्यानंतर समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी सीबीआयनं त्यांच्यावर आर्यन खान प्रकरणात खोटे गुन्हे दाखल करुन खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 


बॉलिवूड ड्रग कनेक्शन 


आर्यन खान प्रकणानंतर समीर वानखेडे यांनी संपूर्ण बॉलिवूडमध्ये ड्रग्जचं जाळं पसरल्याचा दावा केला आणि बॉलिवूडकर अंमली पदार्थ विरोधी एजन्सीच्या म्हणजेच, NCB च्या निशाण्यावर आले. त्यानंतर NCB कडून दीपिका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि इतरही बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करण्यात आली. पण या चौकशीच नंतर पुढे काहीच झालं नाही. 


What Is Aryan Khan Cruise Drugs Case : काय आहे आर्यन खान प्रकरण ? 


एनसीबीनं 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीनं या क्रूझवरून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यानंतर एनसीबीनं याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती.