मुंबई : क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात आर्यन खानच्या जामीन प्रकरणावर आजची सुनावणी संपली आहे. न्यायालयाचे कामकाज संपल्याने या प्रकरणाची सुनावणी आता उद्यावर ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगातच जाणार असल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान या प्रकरणातील मनीष राजगढिया आणि अवीन साहू  यांना जामीन मंजूर झाला आहे.  


आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्याने ड्रग्ज घेतलेले कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एनसीबीने अधिाकरांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडले.त्याची वैद्यकीय चाचणीदेखील केली नाही. अरबाजच्या बुटात काही प्रमाणात ड्रग्ज सापडलं असा युक्तीवाद आर्यन खानचे वकील माजी अॅटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी केला.  


दरम्यान आर्यनच्या जामिनाला एनसीबीचा विरोध केला होता. गुणवत्तेच्या आधारावर आर्यनच्या जामिनाची याचिका फेटाळून लावण्याची एनसीबीच्या वकिलांनी मागणी केली होती. तपासाच्या या टप्प्यावर जामीन दिल्यास खटल्यावर थेट परिणाम होईल असा दावा एनसीबीच्या वतीनं करण्यात आला होता. या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल फुटला आहे, त्यामुळे प्रभाकर साईल यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची न्यायालयानं दखल घेऊ नये अशी विनंती एनसीबीच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केली होती. 


दरम्यान, आर्यनच्या सुनावणीच्या वेळी कोर्टरुममध्ये प्रचंड गर्दी झाली होती. कोर्टातील गर्दी वाढल्यानं न्यायाधीशांनी कामकाज काही वेळ थांबवलं होतं.


गेल्या आठवड्यात बुधवारी विशेष एनडीपीएस कोर्टानं आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात विशेष एनडीपीएस कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या जामिनावर सुनावणी झाली आहे. 


आर्यन खान क्रूझ पार्टी ड्रग्ज प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम



  • 2 ऑक्टोबरच्या शनिवारी मुंबई क्रुझ टर्मिनलवर धाड

  • 3 ऑक्टोबरला रविवारी आर्यनला अटक आणि सुट्टिकालीन कोर्टाकडनं पहिली रिमांड 4 ऑक्टोबरपर्यंत

  • 4 ऑक्टोबरला पुढील तपासासाठी एनसीबीला नियमित कोर्टाकडनं मिळाली 7 ऑक्टोबरपर्यंत रिमांड

  • 7 ऑक्टोबरला मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टानं आर्यनला न्यायालयीन कोठडी सुनावली

  • आर्यनखानची रवानगी आर्थर रोड कारागृहात, कोरोनाकाळामुळे नियमाप्रमाणे आठवड्याभरासाठी विलगीकरण कक्षात ठेवलं

  • न्यायालयीन कोठडी मिळताच आर्यनच्या जामिनाची याचिका सादर करण्यात आली

  • 8 ऑक्टोबरला जामीनावर सुनावणी झाली, मात्र एनसीबीनं त्यावर आक्षेप घेतला

  • मुख्य महानगदंडाधिकारी कोर्टाच्या कार्यक्षेबाहेरील हे प्रकरण असल्याचा एनसीबीचा दावा मान्य, जामीन फेटाळला

  • 9-10 ऑक्टोबर शनिवार रविवार असल्यानं कोर्ट बंद

  • 11 ऑक्टोबरला सोमवारी जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टात सादर

  • एनसीबीनं अपेक्षेप्रमाणे उत्तर देण्यासाठी मागितला आठवड्याचा अवधी, मात्र बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे कोर्टाकडून निर्देश

  • 12 ऑक्टोबर कोर्टात काहीही कारवाई नाही

  • 13 ऑक्टोबर जामीनावर सुनावणी, एनसीबीचा जोरदार विरोध

  • समाजातील प्रतिष्ठा पाहता तो बाहेर आल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो. तसेच आपलं वजन वापरून त्याच्यावतीनं पुराव्यांशी छेडछाड आणि अन्य साक्षीदारांवर दबावही आणला जाऊ शकतो. असा दावा करत एनसीबीनं बुधवारी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला.

  • आरोपीकडे अमली पदार्थ सापडोत अथवा न सापडोत, एनडीपीएस कायद्यातील कलम 29 नुसार अश्या कटात सामील असणं हा एक गंभीर गुन्हा आहे. तुमच्याकडे ड्रग्ज नाही जरी सापडले तरी जेव्हा एनडीपीएस कायद्यातील कलम 29 लावलं जातं तेव्हा आरोपी मुख्य सुत्रधाराइतकाच दोषी असतो असं एनसीबीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी कोर्टाला सांगितलं.

  • 14 ऑक्टोबरला जामीनावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश वी.वी. पाटील यांनी निकाल राखून ठेवला

  • 15 ते 19 ऑक्टोबर कोर्ट सणासुदीच्यानित्तानं बंद असल्यामुळे निकाल 20 ऑक्टोबरपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न करू : कोर्ट

  • 20 ऑक्टोबर कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला


महत्वाच्या बातम्या :