मुंबई :  समीर वानखेडे यांच्या यांच्या याचिकेत मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.  समीर वानखेडे यांनी शाहरूख खानसोबत झालेल्या संभाषणाची प्रत याचिकेसोबत जोडली आहे.  माझ्या मुलाची काळजी घे, असं अनेकदा शाहरुख संभाषणात म्हणाला आहे. एबीपी माझाच्या हाती हे संभाषण लागले असून अनेकदा दोघांनी चॅट केल्याची माहिती समोर आली आहे.   


शाहरूखच्या प्रत्येक लांबलचक मेसेजमधून एका बापाची अगतिकता स्पष्ट होते. तर समीर वानखेडे यांनी दिलेल्या उत्तरातून ते आपलं कर्तव्य बजावत असल्याचं स्पष्ट होते. शाहरूखने वारंवार वानखेडे यांना मुलाचं साधेपण उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, हे या चॅटमधून उघड झाले आहे. हे चॅट 3 ऑक्टोबर 2021 रोजीचे आहे.  सकाळी 10 वाजून 37 मिनिटांनी  केले आहे.  






मुंबईतल्या कॉर्डिलिया क्रूझवर आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली.  या याचिकेसोबत संभाषणाची प्रत जोडण्यात आली आहे. सुट्टीकालीन कोर्टात ही याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती अरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर तातडीनं सुनावणीची मागणी केली होती. वानखेडेंची मागणी हायकोर्टाकडून मान्य झाली आहे. विधिज्ञ रिझवान मर्चंट, आबाद पोंडा मांडणार वानखेडे यांची बाजू मांडणार आहे. CBIचे वकीलही यावेळी युक्तिवाद करणार आहेत.


काय आहे आर्यन खान प्रकरण?


एनसीबीने 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीने या क्रूझवरून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यानंतर एनसीबीनं याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. 


एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनच्या मोबाईलमधील व्हाट्सअ‌ॅप चॅट मिळवले होते. अभिनेत्री अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचा एनसीबीचा आरोप होता. या दोघांतील व्हाट्सअ‌ॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टातही सादर केला होता.  आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह जवळपास 20 जणांना अटक करण्यात आली होती.