Sameer Wankhede Case : समीर वानखेडे यांनी वरिष्ठांना दिलेला टिप्पणीचा कागद फाईलमधून गायब आहे, त्यांनी आर्यन खान प्रकरणात जो ड्राफ्ट दिलेला होता, तो बदलण्यात आला आहे आणि त्यांनी दिलेली आरोपींची यादीही बदलण्यात आली आहे असा आरोप समीर वानखेडे यांच्या वकिलांनी केला आहे. समीर वानखेडे ज्यावेळी एनसीबीमध्ये नव्हते त्यावेळी या अनेक गोष्टी घडल्या, त्यामागे नेमकं कोण आहे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. 


समीर वानखेडे यांच्या वकिलांनी एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्यावर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, आर्यन खान याला या केसमधून का ड्रॉप करण्यात आलं हे कोर्टासमोर सांगण्यात आलं आहे. या प्रकरणात सर्व आरोपींवर कोणत्या कलमान्वये गुन्हे दाखल करावेत याची एक नोट समीर वानखेडे यांनी फाईलमध्ये दिली होती. ती नोट आता गायब झाल्याचं समोर आलं आहे. तक्रारीचा जो ड्राफ्ट देण्यात आला होता, तो आता नष्ट करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींची यादी बदलण्यात आली आहे. 


एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी समीर वानखेडे यांना टारगेट करुन त्यांना फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्या वकिलांनी केला आहे. समीर वानखेडे हे सीबीआयला या चौकशीत सहकार्य करतील पण सीबीआयनेही आता या प्रकरणाच्या चौकशीची व्याप्ती वाढवावी अशी मागणी समीर वानखेडे यांच्या वकिलांनी केली आहे. 


समीर वानखेडे यांचं ज्ञानेश्वर सिंह आणि शाहरुख खान यांच्यासोबतचे चॅट न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. समीर वानखेडे यांच्यावर राजकीय हेतून आरोप करण्यात आलेले आहेत. शाहरुख खान समीर वानखेडे यांना एक प्रामाणिक अधिकारी समजतो, त्यामुळेच त्यांच्यावरील सर्व आरोप चुकीचे आहेत.


ज्ञानेश्वर सिंह यांच्यासोबतचे चॅट हे कोर्टासमोर दाखल करण्यात आले आहेत. समीर वानखेडे यांनी जो काही निर्णय घेतला तो ज्ञानेश्वर सिंह यांना चॅटच्या माध्यमातून सांगण्यात आला. ज्ञानेश्वर सिंह यांच्या सांगण्यावरुनच सरकारी वकील बदलण्यात आला. त्यांच्याच सांगण्यावर आर्यन खान याला पोलिस कस्टडी देण्यात आली.


जोपर्यंत ही सुनावणी सुरू आहे, तोपर्यंत वानखेडे सीबीआयला चौकशीमध्ये सहाय्य करतील असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर 22 मे पर्यंत समीर वानखेडे यांना अटक करु नये असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. 


ही बातमी वाचा: