मुंबई : देशासह संपुर्ण जगावर कोरोना व्हायरसचं संकट आहे. यामुळे अनेक छोट्यातल्या छोट्या व्यवसायापासून मोठ्यातल्या मोठ्या व्यवसायांना याचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आलं आहे. तर अनेक ठिकाणी मागणी अभावी व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशाच प्रकारे कायम दुर्लक्षित असणाऱ्या शिल्पकला व्यवसायाला देखील मोठा फटका बसला आहे.


यंदा या व्यवसायिकांना वर्षभर हाताला काम नसल्याचं समोर आलं आहे. या व्यवसायिकांचा वर्षभरातील मोठ मोठे सण, समारंभ यामध्ये गणेशोत्सवात डेकोरेशन तयार करणे, नवरात्री उत्सवात वेगवेगळे सेट तयार करणे, लग्न सोहळ्यात सेट तयार करणे, चित्रपटांचे सेट तयार करणे अशी कामे सुरू असतात. यंदा कोरोनामुळे यातील एकही काम हाताला नसल्याचं समोर आलं आहे. परिणामी लाखो कामगारांवर मागील पाच महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे. यंदा गणेशोत्सवावर कोरोना व्हायरसचं सावट आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय सर्व गणेशमंडळांनी घेतला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात आधी विविध ' मंडळात डेकोरेशन करून देणाऱ्या कला दिग्दर्शकांना आणि कामगारांना हाताला काम उरलेलं नाही.

राज्य सरकारने मदत करावी

एकीकडे शुटिंग अजूनही म्हणावे असे सुरू नाही, लग्नाचा पुर्ण सीजन टाळेबंदीत गेला आणि आता गणेशोत्सवात काम नाही. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लाखो नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर कुटुंब चालवणं देखील अवघड होऊन गेल्याचं कलाकारांचं म्हणणं आहे. नुकतीच याबाबत कला दिग्दर्शक संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अशा कामगारांसाठी थोड्याफार प्रमाणात मानधन द्यावे, या कलाकारांचे अनेक ठिकाणी पैसे अडकले आहेत. ती मिळवून देण्यासाठी एका समितीची स्थापना करावी. राज्यशासनाच्या सांस्कृती नियोजन समितीत कला दिग्दर्शक संघापैकी एका सदस्याला संधी द्यावी. अशी मागणी केली आहे. यासोबतच़ परिवहन मंत्री अनिल परब यांना प्रत्येक्ष भेटून आपल्या मागण्यांचं निवेदन देखील दिलं आहे.

कोरोना चाचणी बंधनकारक केल्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या घटली!

लॉकडाऊनमुळे व्यवसाय डबघाईला

याबाबत बोलताना कला दिग्दर्शक संघाचे उपाध्यक्ष अमन विधाते म्हणाले की, कोरोना व्हायरसचा राज्यात प्रादुर्भाव राज्यात सुरू झाला आणि याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. आमच्या व्यवसायामध्ये तर वर्षभर आम्ही जे विविध चित्रपट, मालिकांचे शुटिंग, लग्न सोहळ्यासाठी वापरत असणारे सेट्स, गणेशोत्सवाला विविध मंडळांसाठी तयार केलेले सेट जसेच्या तसे पडून आहेत. सध्या सर्वच ठप्प आहे. गणेशोत्सव देखील साधेपणाने साजरा करण्यात येतोय. त्यामुळे वर्षभर आम्ही जे साहित्य विविध ठिकाणी वापरत असतो. ते जसेच्या तसं पडून आहे. त्यासाठी जागा भाडं स्वरूपात 50 हजारांपर्यंतची रक्कम महिन्यांला मोजावी लागतेय. एकीकडे काम नाही दुसरीकडे हे व्यवस्थित ठेवणं मोठं जिकरीचं काम होऊन बसलं आहे. सध्या पावसामुळे तर मंडप बांधण्यासाठी आवश्यक असणारे बांबूना वाळवी लागण्यास सुरुवात झालीय तर लोखंडी खांब गंजु लागले आहेत. जर आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर या वस्तूंची काहीच किंमत राहणार नाही.

Gym Opening | 15 ऑगस्टच्या मुहुर्तावर जीमला परवानगी देऊ- मंत्री विजय वडेट्टीवार