मुंबई : सारथी संस्थेसंदर्भात आज राज्यसरकारमार्फत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु, या बैठकीदरम्यान, मान-अपमानाचं नाट्य रंगलं. मराठा समाजाच्या विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं. त्यावरून उपस्थित असलेल्या मराठा समाजाच्या समन्वयकांनी यासंदर्भात आक्षेप नोंदवला आणि सभेमध्ये गोंधळ झाला. यादरम्यान, संभाजीराजे छत्रपतींनी सामंजस्याची भूमिका घेत परिस्थिती शांतपणे हाताळली. अशातच या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत बैठकीतील गोंधळ मिटवला. दरम्यान, सभागृहात झालेल्या गोंधळानंतर बैठक सभागृहात न घेता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात संभाजीराजे छत्रपतींसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात आली.


पाहा व्हिडीओ : सारथीच्या बैठकीत गोंधळ, संभाजीराजेंना तिसऱ्या रांगेत बसवल्याने नाराजी



सारथी संस्थेवरून गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत होते. अशातच अनेक राजकीय नेते या संस्थेवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत होते. आता सारथी संस्थेशी निगडीत मतमतांतराच्या नाट्यामध्ये आता आणखी एक वाद जोडला गेला आहे. आज मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत मान-अपमानाचं नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेबाबत एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. गेल्या काही दिवसांपासून मराठा सामाज्याच्या विकासाठी या संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्यानं केली जात आहे. याच पार्श्वभूमीवरही बैठक बोलावण्यात आली असून बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. तसेच खासदार संभाजीराजे छत्रपतीही या बैठकीला उपस्थित होतं. परंतु, त्यांना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आलं. त्यामुळे सभास्थळी उपस्थित असलेल्या मराठा समाजाच्या समन्वयकांनी आक्षेप नोंदवत गोंधळ घातला.


मराठा समाजाच्या समन्वयकांनी आक्रमक पवित्रा घेत खासदार संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात येणार असेल तर आम्ही बाहेर कसं तोंड दाखवणार, असा सवाल उपस्थित केला. मात्र यावेळी संभाजीराजेंनी सामंजस्याची भूमिका घेत, 'मी येथे केवळ एक सदस्य म्हणून आलो आहे. त्यामुळे मान-अपमान महत्त्वाचा नाही. तर सारथी संस्था महत्त्वाची आहे.' असं म्हणत मराठा समाजाच्या समन्वयकांची समजूत काढली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मध्यस्थी करत गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न केला.


 महत्त्वाच्या बातम्या : 


'सारथी'च्या उद्घाटनाची बिले थकवणाऱ्यांनी संस्था कशी चालवायची ते शिकवू नये : सचिन सावंत


सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळालेली नाही, याचिकाकर्ते विनोद पाटलांची माहिती


मराठा आरक्षणाच्या वैधतेवर लवकरच नियमित सुनावणी, पुढील बुधवारी अंतरिम आदेशासाठी युक्तिवाद


मराठा आरक्षण मुद्यावर महाविकास आघाडी सरकारचं दुर्लक्ष, याचिकाकर्त्यांचा आरोप


अशोक चव्हाणांना मराठा आरक्षण उपसमितीवरून हटवण्याची मागणी, आंदोलकांची मागणी अर्धवट माहितीवर असल्याचा चव्हाणांचा खुलासा