मुंबई : मुंबईत एक प्रभाग एक गणपती राबवण्याचे मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडळांना आवाहन केले आहे. अंधेरी पश्चिम इथं पालिकेच्या के पश्चिम विभागाच्या वतीने हे आवाहन करण्यात आलं आहे. के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी हे आवाहन केलं आहे. मात्र, या आवाहनाला मुंबईतील सार्वनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं विरोध केलाय.


के पश्चिम या विभागात 150 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं असली तरी 13 प्रभागात 13 सार्वजनिक गणेशमूर्ती स्थापन करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. कोविड संकटात गर्दी होवू नये, यासाठी पालिकेने हे आवाहन गणेश मंडळांना केलं आहे.


"एका प्रभागात एकच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून इतर ठिकाणी कोविडचे स्क्रिनिंग कॅम्प, रक्तदान शिबिर घेण्यात यावे" असं आवाहन महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी केलंय.


भिवंडीत टाटा आमंत्रा येथील क्वॉरंटाईन सेंटरमधून उडी मारुन रुग्णाची आत्महत्या


मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिकेने संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबई सारख्या ठिकाणी गर्दी रोखण्याचं आव्हान महापालिकेपुढे आहे. त्यामुळे सणांच्या काळात गर्दी होऊ नये म्हणून पालिका मंडळांना आणि नागरिकांना असं आवाहन करत आहे.


सार्वनिक गणेशोत्सव समन्वय समितीचा विरोध
मात्र, या आवाहनाला मुंबईतील सार्वनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं विरोध केलाय. सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबांवकर यांनी सांगितलेय की, "यंदा सर्व मंडळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे गणेशोत्सव साधेपणानं साजरा करणार आहेत. मात्र, एक प्रभाग-एक गणपती ही संकल्पपना मान्य नाही"


गरज पडली तर मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ
समन्वय समितीनं गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव आधी ठरल्याप्रमाणेच उत्सव साजरा करण्याचा सूचना दिल्या आहेत. समन्वय समितीसोबतच मुंबईचा राजा गणेशगल्लीच्या वतीने एक प्रभाग एक गणपती योजनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. याबाबत बोलताना लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव स्वप्नील परब म्हणाले की, "के पश्चिमच्या अधिकाऱ्यांनी केवळ त्यांच्या विभागासाठी मंडळाना आवाहन केलं आहे. जर महापालिकेने हा निर्णय घेतला तर आम्ही याचा विरोध करु. याबाबत महापौरांची भेट घेऊ गरज पडली तर मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ" त्यामुळे, यंदा कोरोना संकटाच्या पार्श्शवभूमीवर गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याची गरज असताना गणेशोत्सवापूर्वीच प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये दुमत होतांना दिसून येतंय.


Community Corona Spread | भारतात कोरोनाचा समूह संसर्ग, दररोज 30हजार रुग्णांची वाढ चिंताजनक - IMA