The Kashmir Files : 'कश्मीर फाइल्स' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देशात हिंदू-मुस्लिम तणाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले आहे. या चित्रपटाचा वापर तणाव वाढवण्यासाठी करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. राज्यासह देशात राम नवमीच्या दिवशी दंगल उसळली होती. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे वक्तव्य महत्त्वाचे समजले जात आहे.
राम नवमीच्या दिवशीच्या राज्यासह देशभरातील विविध ठिकाणी दोन गटात हिंसाचार, तोडफोड करण्याचे प्रकार घडले होते. मुंबईतही मानखुर्द मध्ये दोन गटांमध्ये राडा झाला होता. या राड्यात 30 ते 40 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणात सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, कश्मीर फाइल्स प्रदर्शित झाल्यानंतर हिंदू मुस्लिम तणाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा अंदाज आहे. याबाबतची चौकशी सुरू आहे. मुंबईत दोन गटात झालेल्या हिंसाचार प्रकरणी चौकशी सुरू असून त्यावर भाष्य करणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.
पाहा: काश्मीर फाईल्स चित्रपट आल्यानंतर हिंदू- मुस्लिम तणाव वाढवण्याचा प्रयत्न होतोय: वळसे पाटील
मुंबईच्या मानखुर्दमधील म्हाडा कॉलनीत रविवारी रात्री जमावाकडून तोडफोड करण्यात आली. दोन गटात झालेल्या राड्यात तीस ते चाळीस गाड्यांची तोड फोड करण्यात आली. पोलिसांनी या राड्याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे. विभागात पोलिसांचा बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे.
रविवारी, मानखुर्द येथील पीएमजीपी म्हाडा कॉलनीत दोन गटात मोठा वाद झाला. या वादातून काही तरुणांमध्ये मारहाण झाली. त्यानंतर रात्री उशिरा तब्बल 30 ते 40 वाहनांची तोडफोड करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, दोन्ही बाजूने पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत एका गटातील पाच आणि दुसऱ्या गटातील दोघांना असे एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तणाव वाढवणाऱ्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.