Anil Parab PC : "पाडकाम केलेलं कार्यालय अनधिकृत नव्हतं. किरीट सोमय्यांनी बिल्डरांकडून सुपारी घेतली आहे," असा घणाघात शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनिल परब (Anil Parab) यांनी किरीट सोमय्यांसह (Kirit Somaiya) भाजपवरही टीका केली. तसंच कार्यालयाचं पाडकाम पाहायला वांद्रे इथे येणाऱ्या किरीट सोमय्या अनिल परब यांनी आव्हान दिलं. "त्यांना इथे यायचं असेल तर पोलिसांनी त्यांना अडवू नये. त्यांनी इथे यावं, आम्ही स्वागत करायला तयार आहोत. त्यांनी शिवसैनिकांचा पाहुणचार अनुभवावा," असं अनिल परब म्हणाले. तर किरीट सोमय्यांना पोलिसांनी बीकेसीमध्येच रोखलं. संभाव्य वादाची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारी म्हणून किरीट सोमय्यांना अनिल परब यांच्या निवासस्थानी जाण्यापासून अडवलं.


पत्रकार परिषदेत अनिल परब म्हणाले की, "म्हाडा आणि या इमारतीमधील रहिवासी म्हणून बोलत आहे. या इमारतीत माझा जन्म झाला आणि बालपण गेलं. आता या इमारती म्हाडाच्या मालकीच्या राहिलेल्या नाही. सोसायटीची जागा मला वापरायला दिली होती. रहिवांशाच्या विनंतीवरुन जनसंपर्क कार्यालयासाठी सोसायटीची जागा वापरत होतो. परंतु या जागेबाबत काहींनी तक्रारी केली. मी मंत्री झालो तेव्हा किरीट सोमय्यांनी यांनी म्हाडाच्या लोकायुक्तांकडे जाऊन हे कार्यालय अनधिकृत असल्याचं सांगितलं. यावर म्हाडाने मला नोटीस दिली, त्याला मी उत्तर दिलं. ही जागा माझी नाही यासंदर्भात मी स्पष्टीकरण दिलं. मी फक्त जागा वापरत होतो. त्यानंतर म्हाडाने नोटीस मागे घेतली. रहिवासी कोर्टात गेले तेव्हा रेग्युलायझेशनचा अर्ज केला. म्हाडाने मला पत्र दिलं की रेग्युलाईज करता येणार नाही. किरीट सोमय्यांनी म्हाडावर दबाव टाकला."


 "ही गरिबांची घरं आहेत. म्हाडाच्या 56 वसाहती आहेत. 220 स्क्वेअर फुटांची जागा आहे तेवढीच जागा द्यायची. बिल्डरांची सुपारी सोमय्यांनी घेतली आहे, ज्यात म्हाडाच्या ऑर्डरचा फायदा घेतला जाऊ शकतो. हा विषय आजचा नाही. 20 वर्षांपूर्वी आम्ही अर्ज केलेला आहे. अनिल परब यांचं कार्यालय तोडले तर दहशत निर्माण करता येईल. मराठी माणसाच्या घरावर हा घाला आहे," असं अनिल परब म्हणाले. 


'किरीट सोमय्यांनी शिवसैनिकांचं स्वागत अनुभवावं'


"भाजपला ही भूमिका मान्य आहे का? किरीट सोमय्या कोण आहे? म्हाडाचा अधिकारी आहे का? असे प्रश्न अनिल परब यांनी विचारले. माझ्यासारखी 56 जणांवर कारवाई झाली तर त्याची जबाबदारी किरीट सोमय्यांची असेल. मी किरीट सोमय्यांना आव्हान देतो की, आम्ही स्वागत करायला तयार आहोत. त्यांनी शिवसैनिकांचं स्वागत अनुभवावं. गरिबांच्या घरावर वरवंटा फिरवला जाणार असेल तर सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे.


मी किरीट सोमय्यांना मोजत नाही. माझ्यासोबत सर्व 56 वसाहतीतील लोक आहेत. गरीबांच्या पोटावर जर किरीट सोमय्या येणार असेल तर मी सामोरं जाईन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर देखील हा विषय मांडणार आहे. मी पोलिसांना सांगितलं आहे, किरीट सोमय्या इकडे येऊ द्या, आम्ही स्वागत करु. माझ्यावर हल्ला म्हणजे उद्धव ठाकरेंवर हल्ला असं त्यांना वाटतं. आता आम्ही रस्त्यावर आलोय, त्यामुळे आता उत्तर देणार आहे, असं अनिल परब म्हणाले. 


किरीट सोमय्यांना पोलिसांनी बीकेसीजवळ रोखलं


दरम्यान, म्हाडा कॉलनीमधील अनिल परब यांचं अनधिकृत कार्यालय तोडलं. हे पाडकाम पाहण्यासाठी किरीट सोमय्या वांद्र्याच्या दिशेने रवाना झाले होते. परंत अनिल परब यांच्या घराजवळ शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. किरीट सोमय्या इथे दाखल झाले तर अनुचित प्रकार किंवा संघर्ष होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी त्यांनी बीकेसी इथे अडवलं आहे.


अनिल परब यांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद


दरम्यान अनिल परब यांच्या घराकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे. या रस्त्यावर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी अनिल परब यांच्या घराजवळ गर्दी केली आहे.


संबंधित बातमी


Kirit Somaiya : अनिल परब यांच्या वांद्रे येथील अनधिकृत कार्यालय तोडल्याचा किरीट सोमय्या यांचा दावा, शिवसैनिकांची गर्दी होण्याची शक्यता