मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)  यांनी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांचे वांद्रे येथील म्हाडा (Mhada) कॉलनमधील अनधिकृत कार्यालय तोडल्याचा दावा केला होता..या संदर्भातील फोटो ट्विट करत हे कार्यालय अनिल परब यांचेच असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी काल केला. आज या तोडलेल्या ठिकाणाची पाहणी देखील करण्यासाठी सोमय्या येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भागात शिवसैनिकांचीही गर्दी होण्याची शक्यता आहे.


अनिल परब यांचे वांद्रे येथील  कार्यालय अनधिकृत असल्याची तक्रार सोमय्या यांनी लोकायुक्तांसमोर केली होती. त्यानंतर म्हाडानेही हे बांधकाम पाडण्याची नोटीस दोन वेळा परब यांना दिली होती. मात्र परब यांनी हे बांधकाम पाडले नाही. परब यांनी हे बांधकाम नियमित करण्यासाठी म्हाडाकडे प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव म्हाडाने फेटाळून लावला. त्यामुळे सोमय्या यांनी पुन्हा म्हाडाला पत्र लिहून हे बांधकाम पाडण्याची मागणी केली. त्याची दखल घेत म्हाडाने हे बांधकाम पाडल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. 






अनिल परबांच्या अनाधिकृत कार्यालयासमोरील पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या दुपारी 12.30 पर्यंत अनिल परबांच्या घरासमोरच असलेल्या कार्यालयाच्या पाहणीसाठी दाखल होणार  आहे. शिवसैनिक अनिल परबांच्या घरासमोरील परिसरात जमण्याची शक्यता आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आली आहे. 


अनिल परबांविरोधात आमचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनीही म्हाडाकडे तक्रार केली होती. त्यांचे सरकार असल्यानं कारवाई झाली नव्हती. आता अनिल परब यांची आमदारकी रद्द व्हावी यासाठी तक्रार करणार  असल्याची प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिली आहे.  


शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे वांद्रे परिसरातील म्हाडा कॉलनी इमारत क्रमांक 57 आणि 58 या ठिकाणी कार्यालय आहे. हे जनसंपर्क कार्यालय अनधिकृत असून ते पाडण्यात यावे अशा आशयाचे पत्र भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हाडाला दिले होते.  या प्रकरणात काही वर्षांपूर्वी किरीट सोमय्या यांनी हे कार्यालय अनधिकृत असून ते पाडण्याची मागणी करणारी याचिका लोकायुक्तांपुढे सादर केले होती. त्यापूर्वी  विलास शेगले या व्यक्तीने देखील म्हाडाकडे तक्रार करून हे बांधकाम पाडण्यात यावं अशी मागणी केली होती.