Mumbai Election : मुंबई पदवीधर मतदारसंघातून तरुण नेत्याला शिवसेना ठाकरे गट उतरण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये शिवसेना सचिव वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्या नावाचा विचार सुरू आहे. तसेच दुसरीकडे अनिल परब (Anil Parab) यांचंही नाव चर्चेत आहेत. त्यामुळे मुंबई आणि कोकण पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट नेमका कोणाला उमेदवारी देणार हे पाहावं लागेल.
मुंबई आणि कोकण पदवीधर (Mumbai And Konkan Graduate Constituency) तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात 2024 मध्ये निवडणुका होणार आहेत. त्यासाठी नोंदणी जोमाने सुरु आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती आहे. तर याच मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार अनिल परब यांनासुद्धा उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे.
अनिल परब यांची विधान परिषदेची टर्म जुलै 2024 मध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे अनिल परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे उमेदवार असू शकतात. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून तरूण उमेदवाराला संधी देण्यात येणार असल्याची माहितीही समोर येत आहे.
कोकणातून किशोर जैन यांचे नाव फायनल?
मुंबई पदवीधर विधानपरिषदेच्या जागेसाठी या आधी ठाकरे गटाकडून विलास पोतनीस यांना उमेदवारी देण्यात आली होती. ते सध्या या जागेवर आमदार आहेत. तर कोकण मतदारसंघातून किशोर जैन यांच्या नावावर विचार सुरू आहे. या पदवीधर मतदारसंघांसाठी 2018 ला निवडणूक पार पडल्या होत्या. त्यामुळे आता याची टर्म संपत आल्याने लवकरच निवडणुका होणार आहेत
कोकण मतदारसंघातून निरंजन डावखरे यांच्या विरोधात कोकणातील ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख आणि अनंत गीते यांचे विश्वासू शिवसैनिक किशोर जैन यांच्या नावाची वर्णी लागल्याची सूत्रांची माहिती आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात नुकत्याच कोकण खळा बैठका पार पडल्या होत्या. कोकण आणि मुंबईच्या अहवालाची जबाबदारी ही किशोर जैन यांच्यावर जबाबदारी होती.
या निवडणुकीसाठी मतदारांची प्रारूप यादी 23 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत या याद्यांवर हरकती मागविण्यात येत आहेत.
ही बातमी वाचा: