वर्धा : न्यायालयात न्याय मिळेल याची काही गॅरंटी नाही, या देशातले निवडणूक आयोग कॉम्प्रमाईज झालं आहे असा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष (Akhil Bharatiya Andhashraddha Nirmoolan Samiti) श्याम मानव (Shyam Manav) यांनी केला. अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) खोटे अॅफिडेव्हिट लिहून दिले नाही, म्हणून त्यांना जेलमध्ये जावं लागल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच आमदारांच्या अपात्रतेवर कोर्ट काहीही करणार नाही हे गुवाहाटीवरून आलेल्या एका मंत्र्याने त्याचवेळी सांगितलं होतं असाही दावा श्याम मानव यांनी केला. श्याम मानव यांनी वर्ध्यामध्ये एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी हे सर्व आरोप केले आणि सध्या देशात लोकशाही नसल्याचं म्हटलं. 


कोर्ट काही करणार नाही, अडीच वर्षे सरकार टिकेल 


कुणीच अपात्र होणार नाही, न्यायालय काहीही करणार नाही असं गुवाहाटीवरून आल्यानंतर मंत्र्याने सांगितलं, आज तसंच घडतंय असा दावा श्याम मानव यांनी केला. ते म्हणाले की, माझा एक मित्र जो मंत्री होता, मंत्रिमंडळामध्ये असताना तो गुवाहाटी वरून परत आला. त्यावेळेस त्याने सांगितलेला किस्सा खूप सुंदर आहे. या देशात काही लोकशाही उरलेली नाही, हे 50 घ्या, नाहीतर जेलमध्ये जा. तुम्हाला वाटत असेल फक्त चार पाच लोकांची कागदपत्रं तयार आहे, पण सर्व चाळीसही लोकांची कागदपत्रं तयार आहेत. मंत्रिपद घ्यायचं नसेल तर तर 50 घ्या आणि तेही घ्यायचं नसेल तर जेलमध्ये जा असं त्याला एका माणसाने सांगितलं होतं. कोर्टाच्या निर्णयाची चिंता करू नका असंही त्याने सांगितलं होतं. कोर्ट हस्तक्षेप करेल, पण कोणीही डिस्कॉलिफाय होणार नाही. सुप्रीम कोर्टदेखील हस्तक्षेप करेल आणि तसंच झालं. हायकोर्टाने तारीख वाढवून दिली. उपाध्यक्षांना काहीच करता आलं नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय देखील असा येईल की आमचं अडीच वर्षे सरकार चालेल. त्यानुसार ऑपरेशन सक्सेसफुल झालं असं त्या मंत्र्याने सांगितलं होतं."


दिल्लीचे शाह आमच्यासोबत डायरेक्ट कॉन्फरन्समध्ये असं बोलत होते, म्हणून मी तुम्हाला सांगतोय असंही त्या मंत्र्याने आपल्याला सांगितल्याचा दावा शाम मानव यांनी केला. 


अनिल देशमुखांनी खोटे अॅफिडेव्हिट लिहून दिले नाही म्हणून जेल


ईडीपासून सर्व गोष्टींचा वापर कसा केला जातो याचा किस्सा अनिल देशमुखांच्या उदाहरणावरून दिसतोय असं श्याम मानव म्हणाले. अनिल देशमुखांनी त्यांच्यावरील ईडीच्या दबावाबद्दल काही माहिती दिल्याचा दावा श्याम मानव यांनी केला. ते म्हणाले की, अनिल देशमुखांना जेलमध्ये जावं लागलं. देशमुखांना अटक व्हायच्या आदल्या दिवशी एक व्यक्ती त्यांच्याकडे गेला आणि त्याने कुणालातरी फोन जोडून दिला. त्या व्यक्तीने देशमुखांकडून चार खोटी अॅफिडेव्हिट लिहून मागितले. 


1) मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी मला बोलावलं आणि दर महिन्याला शंभर कोटी गोळा करायचे असा एक आदेश दिला.


2) उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे याने दिशा सालियन हिचा खून केलेला आहे असं पोलीस तपासामध्ये समोर आलं असं एक अॅफिडेव्हिट द्यावे.


3 ) अनिल परब यांचे हॉटेल वगैरे आहे, त्यांची ती अवैध मालमत्ता आहे पोलीस तपासात पुढे आलं. 


4 ) अजितदादांनी सिंचन घोटाळ्यामध्ये एवढ्या एवढ्या कोटींचा भ्रष्टाचार केला असं आमच्या पोलीस तपासात पुढे आलं असं अॅफिडेव्हिट लिहून द्या. 


वरील चार अॅफिडेव्हिट देशमुखांनी लिहून द्यावेत त्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. नंतर रात्री आठ वाजता त्या माणसाचा पुन्हा फोन आला आणि अजित पवार सोडून इतर तीन अॅफिडेव्हिट लिहून द्या असा आदेश दिला. असं जर लिहून अॅफिडेव्हिट दिलं तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परबांना जेलमध्ये जावं लागेल, म्हणून देशमुखांनी तसं लिहून दिलं नाही. देशमुखांनी ते शरद पवारांना सांगितलं. त्यावेळी शरद पवार म्हणाले की तुम्ही निर्णय घ्या. नंतर उद्धव ठाकरे यांना सांगितलं. पण त्या व्यक्तीने मागितलेले अॅफिडेव्हिट लिहून दिलं नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धाडसत्र सुरू झालं आणि दुपारी अनिल देशमुख जेलमध्ये गेले. 


अधिकाऱ्यांमध्ये हिंमत राहिली नाही


श्याम मानव म्हणाले की, या आधी अनेक अधिकाऱ्यांनी एखादे काम जमणार नसेल तर तसं मंत्र्याच्या तोंडावर सांगितल्याचं मी पाहिलंय. पण आज अधिकारी तसे करण्याची हिंमत करत नाहीत. हे सरकार जाऊदे, मग आपण अॅक्शन घेऊ असं अधिकारी सांगतात. एखाद्या अधिकाऱ्याने काही कारवाई केलीच तर त्याला उचलून कुठे फेकून देतीय याची गॅरंटी नाही असंही ते म्हणाले. 


ही बातमी वाचा: