Anil Deshmukh Case : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणी सीबीआयने सात पोलिसांची चौकशी केली. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सात पोलीस कॉन्स्टेबल अनिल देशमुख गृहमंत्री असताना शासकीय बंगला 'ज्ञानेश्वरी' वर सुरक्षेसाठी तैनात होते. 


सूत्रांनी सांगितले की, अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांच्या भेटीसाठी कोण येत होते, याची माहिती सीबीआय जमा करत आहे. त्याशिवाय काही संशयित हालचाली झाल्यात का, याबाबतही  सीबीआयकडून तपास सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने आतापर्यंत नोंदवलेल्या जबाब आणि या पोलिसांनी दिलेला जबाब पडताळून पाहण्यात येणार आहे. 


अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने सीबीआयला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर सीबीआयने प्राथमिक तपासानंतर अनिल देशमुख यांच्यासह इतरांविरोधात 24 एप्रिल 2021 रोजी गुन्हा नोंदवला होता. 


दरम्यान, अनिल देशमुखांच्या पत्नी आरती देशमुख (Arti Deshmukh) यांना हायकोर्टानं अंतरिम दिलासा दिला आहे. पीएमएलए लवादाचे मालमत्तेच्या जप्तीसंदर्भात अंतिम आदेश दिले तरी आमचे आदेश येईपर्यंत यासंदर्भात कोणतीही कठोर कारवाई करू नका, असे स्पष्ट निर्देश शुक्रवारी न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठानं ईडीला (ED) दिले आहेत. यावर आता 10 जानेवारी रोजी हायकोर्टात पुढील सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या याचिकेत ईडीनंही हायकोर्टात मध्यस्थ याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आम्हाला ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय देऊ नका, अशी मागणी करत ईडीनं आरती देशमुखांना हायकोर्टानं तूर्तास दिलेल्या दिलाशाविरोधात याचिका दाखल केली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha