BMC on Omicron : ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दाखल होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मुंबई महापालिकेने विलगीकरणाची व्यवस्था केली आहे. भायखळा येथे मोफत व्यवस्था करण्यात आली असून ज्यांना तारांकित हॉटेलचा पर्याय निवडायचा आहे, त्यांच्यासाठी महापालिकेने दरपत्रकही जाहीर केले आहेत. मुंबई महापालिकेने ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
मुंबईत ओमायक्रॉनच्या संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी महापालिकेकडून उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून संसर्ग फैलावू नये याचीही काळजी घेतली जात आहे. संसर्गाची उच्च जोखीम असलेल्या तीन देशांतून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणाची आवश्यकता आहे. या प्रवाशांसाठी पालिकेने व्यवस्था केली आहे.
प्रवाशांना भायखळा येथील राहण्याच्या व्यवस्थेपर्यंत पोहचण्यास मदत करण्याकरीता महापालिकेचे कर्मचारी सातही दिवस 24 तास विमानतळावर उपस्थित असल्याचे महापालिकेने सांगितले. ज्या प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी 2,3 व 5 तारांकित हॉटेलची यादी जाहीर करण्यात आली असल्याचे पालिकेने म्हटले.
महापालिकेने तारांकित हॉटेलच्या दरपत्रकात सिंगल, डबल बेडच्या दरासह एकूण जागांबाबतही माहिती दिली आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये सिंगल बेडसाठी सरासरी 4000 रुपये, डबल बेडसाठी सरासरी 4500 रुपये इतका दर आहे.
दरम्यान, ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता मुंबईत (Mumbai Police) सतर्कता बाळगली जात आहे. मुंबई पोलिसांनी Omicron च्या पार्श्वभूमीवर रॅली, मोर्चांना बंदी घातली आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे राजकीय पक्षांना मुंबईत रॅली काढण्यास परवानगी नाकारण्यात आलीय. अमरावती, मालेगाव, नांदेडमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतलाय. राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. राज्यात नव्या 7 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. यातील तीन रुग्ण मुंबईत आहेत. तर चिंतेची बाब म्हणजे गर्दीचं ठिकाण असलेल्या धारावीत आता ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: