Antilia Bomb Scare Case : अँटालिया स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी नरेश गौर याची सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एनआयएला बुधवारी दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे एनआयएला मोठा बसल्याचे मानले जात आहे. एनआयएनं नरेश गौर याला या प्रकरणी अटक केली होती. नरेश गौर याने जामीनासाठी कोर्टात धाव घेतली. याबाबत आज सुनावणी पार पडली. दोन्ही पक्षाची बाजू जाणून घेतल्यानंतर कोर्टानं नरेश गौरच्या बाजूने निर्णय दिला. 


मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नरेश गौर याला जामीन मंजूर केला आहे. अँटालिया प्रकरणातील या पहिल्या जामीनाला स्थगिती देण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलाय. गुणवत्तेच्या आधारावर दिलेल्या जामीनाला स्थगिती देण्याची गरजच काय?, असा प्रश्नही हायकोर्टाने उपस्थित केलाय.  


राजकीय घडामोडी - 
सहा महिन्यापूर्वी घडलेल्या अँटालिया स्फोटकं प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. या काळात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. अनिल देशमुख यांना गृहमत्रिपद गमावावं लागलं. सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे सुद्धा चौकशीच्या फेरीत आहे. 


दरम्यान, मुंबई व ठाणे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंह यांनी पदाचा दुरुपयोग केला होता. अनेकांना खोटय़ा गुह्यात अडकवून त्यांच्याकडून खंडणी उकळली होती. अॅण्टेलिया स्फोटक  आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणानंतर परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी झाली आणि त्यांना होमगार्डच्या संचालकपदी बसविण्यात आले. त्यानंतर परमबीर यांनी आयुक्त असताना त्रास दिला अशांनी त्यांच्या विरोधात खंडणीचे गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. परमबीर यांचा 'खास माणूस' सचिन वाझे हा गजाआड गेल्यानंतर वैद्यकीय कारण सांगत परमबीरसुद्धा चंदिगडला निघून गेले. त्यानंतर सात महिने त्यांचा थांगपत्ताच लागला नाही. अखेर परमबीर यांना 6 डिसेंबरपर्यंत अटक करू नका असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देताच परमबीर मुंबईत दाखल झाले.  


वाझेने खंडणी म्हणून घेतलेला मोबाईल विकायला लावला
मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-11 ने परमबीर सिंह आणि त्याच्या टोळीविरोधात दाखल गुह्याचे आरोपपत्र सादर केले. त्यात साक्षीदारांकडून वेगवेगळे खुलासे करण्यात आले आहेत. 'नंबर एक' म्हणजे परमबीर यांचा 'खास माणूस' सचिन वाझे याने खंडणी स्वरूपात घेतलेला महागडा मोबाईल एका अधिकाऱयाला विकायला लावला होता. त्या अधिकाऱयाने तो मोबाईल विकून एक लाख 20 हजार वाझेला दिले होते. या प्रकरणातील पोलीस निरीक्षक हे गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलचे प्रभारी असताना बुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी वाझेने त्या अधिकाऱयास सीआययूच्या कार्यालयात बोलावून सीपी साहेबांनी त्याला मुंबईतील बुकीकडून कलेक्शन करण्याचे टार्गेट दिल्याचे सांगत त्यात मनन नायक हादेखील आहे. त्याच्यासोबत बिमन अग्रवाल हाच सेटिंग करून देणार असल्याने मनन यास त्रास देऊ नका असेही वाझेने सांगितले होते, असे त्या अधिकाऱयाने जबाबात म्हटले आहे.