मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet) बैठकीमध्ये गौरी गणपती आणि दिवाळी या सणांसाठी आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा शिधा 100 रुपयांत वाटण्यात येणार असल्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांगण्यात आलं आहे. यामध्ये प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेलाचा समावेश या शिध्यामध्ये असणार आहे. सर्वसामान्यांचे सण हे आनंदात जावे यासाठी राज्य सरकारने मागील वर्षी आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी अगदी घाईमध्ये सरकारने एका संस्थेला 513 कोटी रुपयांचं कंत्राट दिलं होतं.
यंदा तरी शिधा वेळेवर पोहचणार?
मागील वर्षी अगदी गुढीपाडव्यापर्यंत आनंदाचा शिधा पोहचला नव्हता. त्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देखील व्यक्त केली होती. त्यामुळे यंदा तरी हा शिधा सामान्यांच्या घरी वेळेवर पोहचणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्यातील केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना हा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. यंदा देखील याच रेशनधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. तसेच राज्यातील सात कोटी नागरिकांना या आनंदाच्या शिध्याचा लाभ मिळणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत होतं. पण तरीही हा शिधा काही वेळत पोहचला नव्हता.
अनेक ठिकणी पूर्ण शिधा पोहचलाच नाही
हा शिधा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो असलेल्या पिशव्यांमधून देण्यात येतो. पण मागील वर्षी या शिध्यामधील बरचसं सामान हे गायब होतं.म्हणजे काही ठिकाणी या किटमधून साखर गायब होती, तर कुठे डाळच या किटमध्ये नव्हती. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर आनंदाच्या शिध्यामधून तेल गायब झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या आनंदाच्या किटमध्ये फक्त डाळ, रवा आणि साखरच असल्याने त्यासाठी 75 रुपये आकारले जात होते. पण यामध्ये तेल नसल्याने बाहेरुन नागरिकांना तेल विकत घ्यावे लागत होते. ज्याची किंमत ही 125 रुपयांपेक्षा अधिक होती. त्यामुळे आनंदाच्या शिध्यासाठी नागरिकांना जवळपास दोनशे रुपये मोजावे लागत होते.
त्यामुळे आधीच वादग्रस्त ठरलेली ही आनंदाचा शिधा योजना यंदा तरी यशस्वी होणार का? आणि नागरिकांना याचा संपूर्ण लाभ घेता येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासाठी वेळेची मर्यादा देखील शासनाने पाळणं आवश्यक असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे यंदा तरी सामान्यांच्या घरात आनंदाचा शिधा वेळेत पोहचणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.