मुंबई : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला (Mumbai University Senate Election) स्थगित दिल्याने राजकीय पक्ष त्यासोबतच विद्यार्थी संघटना नाराज झाल्या आहेत तर विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. सिनेट निवडणूक स्थगित झाल्यावरून आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) सडकून टीका केली. स्थानिक आणि लोकसभा निवडणुकीप्रमाणं मुख्यमंत्री सिनेट निवडणुकीला देखील घाबरले, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला स्थगित दिल्याने राजकीय पक्ष त्यासोबतच विद्यार्थी संघटना नाराज झाल्या आहेत. 9 ऑगस्ट रोजी सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला होता. 10 सप्टेंबरला निवडणूक आणि 13 सप्टेंबरला निकाल, असा हा कार्यक्रम होता. पण व्यवस्थापन परिषदेच्या कालच्या बैठकीत निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित झालाय, एवढं नक्की. यावरून आता विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे.
निवडणूक स्थगित का झाली? आदित्य ठाकरेंचा सवाल
गुरुवारी रात्री 11 वाजता सिनेट निवडणुकांचे पत्र समोर आले. सिनेट निवडणूक पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. आमचा 100 टक्के निकाल लागणार होता. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि नंतर स्थगित झाला. मणिपूरसारखे वातावरण येथे नाही, भांडण नाही,वाद नाही. सव्वा लाख मतदारांनी यामध्ये नाव नोंदविले आहे. मग अस काय घडलं? ही निवडणूक स्थगित का झाली? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे फोन बंद आहेत कोणीही कारण सांगत नाही, असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले.
सिनेट तुमचे सरकार पाडणार नाही आम्ही तुमचे सरकार पाडणार
दोन पक्ष फोडले, दोन परिवार फोडले. महाशक्ती सोबत असून निवडणुकीला घाबरतात का? लोकसभेला देखील असेच करण्याची शक्यता आहे. लोकसभेला देखील निवडणुका जाहीर करतील आणि मग स्थगित करतील. सिनेट तुमचे सरकार पाडणार नाही तुमचे सरकार तर आम्हीच पाडणार आहोत. त्यांची तयारी पूर्ण आहे की नाही माहीत नाही पण तयारी नसेल म्हणून असे झाले असेल, असा टोला आदित्या ठाकरेंनी लगावला आहे.
हे ही वाचा :