Khatara Vehicles: मुंबईत अनेक ठिकाणी स्त्याच्या कडेला बेवारस वाहने आढळतात. या वाहनांमुळे अनेकवेळा मोठी वाहतूक कोंडी होते. अशातच आता मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईतील खटारा गाड्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. संजय पांडे यांनी ट्वीट करत आतापर्यंत शहरातून 358 खटारा वाहने हटवल्याची माहिती दिली आहे. याच ट्वीटमध्ये त्यांनी हे काम जलद गतीने करण्यासाठी टाटा आणि महिंद्रा कंपनींना मदतीचे आवाहन केले आहे. आता त्यांच्या या मदतीच्या आवाहनाला महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी प्रतिसाद दिला आहे. मुंबईतील खटारा वाहने हटवण्यासाठी महिंद्रा लवकरच आपले ट्रक पाठवणार आहे. संजय पांडे यांच्या ट्वीटला रिप्लाय देत आमची ट्र्क टीम तुमच्याशी संपर्क करेल, असे आनंद महिंद्रा यांनी सांगितले आहे.  


आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, ''मुंबईच्या आयुक्तपदी तुमची निवड झाल्यापासून तुम्ही जराही वेळ वाया घालवला नाही. तुमच्या विनंतीला प्रतिसाद देण्यास आम्हीही वेळ वाया घालवणार नाही. आमची @MahindraTrukBus टीम तुमच्याशी संपर्क करेल.''






मुंबई पोलीस आयुक्तांनी काय केलं होत ट्वीट?


सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असणारे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट करत लिहिलं होत की, मुंबई महापालिकेच्या मदतीने शहरातून आतापर्यंत 358 खटारा गाड्या हटवण्यात आल्या असून हे काम अद्यापही सुरू आहे. या खटारा गाड्या देवनारपर्यंत वेगाने नेण्यासाठी मोठ्या लॉरीची गरज असल्याचं ही त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं होत. यासाठी त्यांनी @MahindraRise @TataCompanies टॅग करत मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आज आनंद महिंद्रा यांनी मदत पाठवणार असल्याचं ट्वीट केलं आहे.   


पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही


याआधी मुंबई पोलीस आयुक्तांची ट्वीट करत मुंबईकरांना पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नसल्याचे सांगितले होते. याबाबत ट्वीट करत ते म्हणाले होते की, यापुढे पासपोर्टच्या पडताळणीसाठी स्थानिक पोलीस ठाण्यातून कॉन्स्टेबल अर्जदाराच्या घरी येणार आहे. एखाद्या पोलीस ठाण्याकडून या नियमाचं पालन करण्यात आलं नाही, तर याबाबत तक्रार ही करू शकता, असं ही ते म्हणाले होते. 


वाहातून नियम मोडल्यास डिलिव्हरी बॉयवर होणार कारवाई 


झटपट डिलिव्हरी (Delivery Boy) करण्यासाठी अनेकवेळा डिलिव्हरी बॉयकडून वाहतूक नियम मोडले जातात. यावरच संजय पांडे यांनी फेसबुक लाईव्ह करत  डिलिव्हरी बॉयना इशारा दिला होता. ते म्हणाले होते की, ''माझ्याकडे अनेक नागरिकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करत गाडी चालवणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या तक्रारी केल्या आहेत. यापुढे डिलिव्हरी बॉयने वाहतुकीचे नियम मोडले, तसेच विरुद्ध दिशेने गाडी चालवताना आढळ्यास डिलिव्हरी बॉयसह ते काम करत असलेल्या संबधित कंपनीवर ही कारवाई करण्यात येणार आहे.'' 


संबंधित बातम्या: