मुंबई : शिवडी-न्हावाशेवा ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पग्रस्तांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या प्रकल्पात वरळी, प्रभादेवी, एल्फिन्स्टन, परळ, शिवडी भागातील रहिवाशांची घरं आणि दुकानं बाधित होत असल्याने त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा आणि गाऱ्हाणी त्यांच्यासमोर मांडली. प्रकल्पाचं काम करताना स्थानिक प्रशासनाने कुठल्याही प्रकारची नोटीस किंवा पूर्वकल्पना दिली नाही, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. गेल्या 100 वर्षांपासून त्याच ठिकाणी राहत आहोत, त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना जवळच घरं देण्यात यावी अशी मागणी स्थानकांनी केली आहे.


राज ठाकरे अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतील : नितीन सरदेसाई
याविषयी बोलताना नितीन सरदेसाई म्हणाले की, "शिवडी-न्हावाशेवा ट्रान्सहार्बर लिंक रोड प्रकल्प सरकारने हाती घेतला आहे. या प्रकल्पात एल्फिन्स्टन आणि शिवडीतील इमारती बाधित होत आहेत. इथे अनेक मराठी कुटुंब राहतात. शिवाय अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. इथल्या रहिवाशांचे तीन प्रस्ताव आहेत. पहिला प्रस्ताव त्याच जागी घरं बांधावी, दुसरा प्रस्ताव प्रशासनाच्या जागेवर घरं बांधून द्यावी आणि तिसरा प्रस्ताव मार्केट किंमतीपेक्षा तीन पट पैसे द्यावेत. अशातच एमएमआरडीए, महापालिका आणि प्रशासन कोणीही ऐकत नाही. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यास मदत करतील. 


कसा आहे शिवडी-न्हावाशेवा ट्रान्सहार्बर लिंक रोड?
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे 22 किमी लांबीच्या मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोडचं काम मार्च 2018 पासून सुरु आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा सागरी पूल म्हणून या प्रकल्पाची गणना होणार आहे. दक्षिण मुंबईतून थेट रायगड, पुणे, गोवा महामार्गांना जोडण्याचं काम ट्रान्सहार्बर लिंक रोड करणार आहे. यासाठी शिवडी इथून शिवडी-वरळी कनेक्टर, पूर्व मुक्त मार्ग इथे जोडणी देण्यात येईल. तर नवी मुंबई इथे विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरशी थेट जोडणी असेल. तसंच जेएनपीटी, राज्य महामार्ग 54, नवी मुंबई विमानतळ, मुंबई-पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग या दिशेने प्रवास सुकर होणार आहे. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा चिर्ले इथून आठ किमीवर असेल.


हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबई ते नवी मुंबई हे अंतर गाठताना जवळपास 40 मिनिटांची बचत होणार आहे. तर या मार्गावरुन प्रवास करताना मुंबईकरांना टोल भरावा लागणार असून, प्राथमिक अंदाजानुसार 200 रुपये टोल आकारण्यात येईल.