मुंबई : नववर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई, नवी मुंबईतील नागरिकांची मोठी फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं. टोरेस ज्वेलरीच्या माध्यमातून महिन्याला जवळपास 44 टक्के परतावा देण्याचं आमिष लोकांना दाखवलं गेलं. यामध्ये जवळपास सव्वा लाख नागरिकांनी गुंतवणूक केल्याची प्राथमिक माहिती आहे. हा घोटाळा जवळपास एक हजार कोटींचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी फरार असलेल्या तौसिफ रियाजनं एक रिपोर्ट तपास यंत्रणांकडे दिला होता. त्याची प्रत एबीपी माझाच्या हाती लागली आहे. त्यामध्ये सर्वेश सुर्वेच्या पत्राचा देखील उल्लेख आहे. सर्वेश सुर्वे प्लॅटिनम हर्न प्राइवेट लिमिटेडमध्ये संचालक होता. तौसिफ रियाजचा रिपोर्ट आणि सर्वेश सुर्वेच्या पत्रातून काही बाबी समोर आल्या आहेत. त्यानुसार बेकायदेशीरपणे सोनं आणि चांदी भारतात आणली गेली. 13.76 कोटींचं बोगस कर्ज देखील दाखवलं गेलं. याशिवाय पाँझी स्कीमच्या माध्यमातून उच्च परतावा देण्याचं आमिष देखील दाखवलं गेलं.
सर्वेश सुर्वेनं प्लॅटिनम हर्न प्राइवेट लिमिटेड कंपनीत स्थापनेनंतर संचालक म्हणून काम केलं. तो म्हणाला होता की कंपनी भारतात रिटेल ज्वेलरी बिझनेस व्यवसायात काम करेल, असं त्याला सांगितलं गेलं. विदेशी व्हिसा आणि रोजगार उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, त्यामुळं कंपनीचा संचालक आणि भागधारक झालो.
सर्वेश सुर्वे म्हणाला की मुंबईच्या दादर भागात टोरेस ब्रँड नावानं कंपनीनं ज्वेलरी शोरुम लाँच केलं. सुर्वेनं संचालक पदावर असूनही इतर कोणत्याही शोरुमच्या कामात सहभागी नसल्याचं म्हटलं. सुर्वेच्या तक्रारीनुसार कंपनीनं उच्च बोनस, कॅशबॅकसह 200 ते 600 टक्के रिटर्न देण्याचं आश्वासन देत लोकांकडून पैसे स्वीकारण्यास सुरुवात केली. त्या बदल्यात ग्राहकांना दागिण्यांऐवजी कमी गुणवत्ता असलेल्या मोइसॅनाइटचे दगड दिले गेले. सुर्वेनं हा देखील आरोप केला की कंपनी 13.76 कोटींच्या बोगस लोन व्यवहारात सहभागी होती. बोगस कर्जाची एंट्री कथितपणे लल्लन सिंह नावाच्या व्यक्तीनं केली होती. त्यानं यूएसटीडीच्या माध्यमातून विदेशातून भारतात आलेल्या पैशांचा स्वीकार केला.
सुर्वेनं पुढं म्हटलं की 27 डिसेंबरला त्याला कंपनीच्या लोअर परेल कार्यालयात बोलावलं गेलं. तिथं काही कागदपत्रांवर सही करण्यासाठी दबाव टाकला गेला. मात्र, कर्ज करारावर सही करण्यास नकार दिला तेव्हा धमकी दिली गेली अन् मारहाण करण्यात आली.
कंपनीनं तुर्कीतून 75 किलो सोनं आणि 25 किलो चांदी बेकायदेशीरपणे आणली गेल्याचा दावा करण्यात सुर्वेकरडून करण्यात आला. ते सोनं मुंबईच्या काळंबादेवी परिसरातील एका ज्यूसच्या दुकानावर पोहोचवलं गेलं. याचे पुरावे देखील असून तस्करी झालेल्या सोन्याचे फोटो देखील आहेत, असा दावा सुर्वेनं केला.
तौसिफ रियाजनं स्वत : जागल्या असल्याचा दावा केला आहे. टोरेस घोटाळा यूक्रेन आणि तुर्कीतील बोगस आर्थिक फसवणूक योजनांसारखा असल्याचं म्हटलं. त्या देशातील B2B ज्वेलरी घोटाळ्यासारखाच टोरेसचा घोटाळा असल्याचं म्हटलंय.
B2B ज्वेलरी घोटाळा चार पाच वर्षांपूर्वी झाला होता. B2B ज्वेलरी घोटाळा यूक्रेन, रशिया आणि कझाकिस्तानमध्ये 250 दशलक्ष डॉलर्सची फसवणूक झाली होती.त्यावेळी जवळपास 6 लाख गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली होती.
दरम्यान, शिवाजी पार्क पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे. ज्यामध्ये दोन विदेशी नागरिक आहेत. तर, दोन विदेशी नागरिकांचा समावेश आहे.सर्वेश सुर्वेसह तानिया कसातोवा आणि वॅलेंटिना कुमारी यांना अटक करण्यात आली आहे.
इतर बातम्या :