अंबरनाथ : कॅन्सरमुळे जीव गेलेल्या तरुणावर अंत्यसंस्कार न करता, तो पुन्हा जिवंत होण्याच्या आशेवर त्याचा मृतदेह दहा दिवस चर्चमध्ये ठेवण्यात आला आहे. मुंबईपासून फक्त 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबरनाथमध्ये हा अघोरी प्रकार घडला आहे.


अंबरनाथच्या जीजस फॉर ऑल नेशन्स चर्चमध्ये घडलेली घटना ऐकून कोणालाही धक्का बसेल. मुंबईतल्या चिंचपोकळीमध्ये राहणाऱ्या 17 वर्षाच्या मिशाख नेव्हिसचा 27 ऑक्टोबरला कॅन्सरमुळे मृत्यू झाला. मात्र बिशप असलेल्या वडिलांनी मिशाखवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्याचा मृतदेह 10 दिवस चर्चमध्ये ठेवला.

प्रार्थना केल्यास मुलगा पुन्हा जिवंत होईल, या गैरसमजातून वडिलांनी मृतदेह नागपाड्यातील चर्चमध्ये ठेवला. मात्र पोलिसांनी हटकल्यानंतर कुटुंबीय त्याचा मृतदेह घेऊन अंबरनाथच्या चर्चमध्ये गेले. अंबरनाथच्या चर्चमध्ये सुरु असलेला प्रकार समजल्यानंतर तिथल्या पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिसांनाही त्यांनी मृतदेहाला हात लावून देण्यास नकार दिला.

अखेर, पोलिसांच्या समुपदेशनानंतर मिशाख नेव्हिसचा मृतदेह पुन्हा नागपाड्याला हलवण्यात आला. त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले, की अजूनही त्याच्या मृतदेहासमोर प्रार्थना सुरु आहे हे समजू शकलेलं नाही. मात्र अंधश्रद्धेची परिसीमा गाठणारी ही घटना नक्कीच धक्कादायक आहे.