ठाणे : कोविड काळात अनेक मृत्यू हे संशयास्पद झाल्याने नातेवाईकांनी गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. तसेच नेमका मृत्यू कोविडमुळेच झाला की नाही, त्या रुग्णावर काय उपचार केले गेले, ते बरोबर होते की चुकीचे, सध्या जी उपचार पद्धती आहे ती बरोबर आहे की चुकीची अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे ठाणेकरांना पुढील काही काळात मिळू शकतील कारण, ठाणे पालिका क्षेत्रात झालेल्या सर्व कोविड मृत्यूचे ऑडिट करण्याची मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी केली होती. त्यानुसार काल आयुक्त विपीन शर्मा यांनी एका समितीची स्थापना करून सर्व मृत्यूचे ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. असे करणारी ठाणे महापालिका पहिलीच महापालिका ठरणार आहे.
राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भीमराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी स्थापन करण्यात आली असून या कमिटीमध्ये सिव्हिल सर्जन डॉ. कैलाश पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. मुरूडकर, डॉ. योगेश शर्मा, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम हे सदस्य असून वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू टावरी या सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. ही कमिटी आजपर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचे अन्वेषण करून त्याचा अहवाल महापालिका आयुक्तांना सादर करणार आहे.
"ठाण्यामध्ये covid-19 झालेली मृत्यू आणि त्यांच्यावर झालेली उपचार यासंदर्भात संशोधनकर्त्यांना माहिती मिळावी हा मुख्य उद्देश ठेवून मी सर्व मृत्यूंचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत, मात्र या ऑडिटमध्ये जर एखादा मृत्यू डॉक्टरांच्या चुकीमुळे झालेला असेल तर त्यावर योग्य ती कारवाई देखील करण्यात येईल", असे महापौर नरेश म्हस्के यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
सर्व खाजगी हॉस्पिटलच्या बिलांचे ऑडिट ठाणे महानगरपालिकेने सर्वप्रथम केले होते. त्यामध्ये दोषी आढळलेल्या हॉस्पिटलवर कारवाई देखील ठाणे महानगरपालिकेने केली होती. त्यामुळे आता मृत्यूंचे ऑडिट देखील झाल्यानंतर खासगी हॉस्पिटल वर तसेच सरकारी हॉस्पिटल वर वचक राहणार आहे.