मुंबई : मुंबईतील एका जागरुक प्रवाशामुळे हार्बर लोकलने प्रवास करणाऱ्या शेकडो जणांचे प्राण वाचले आहेत. 23 वर्षीय इंजिनिअर गुरुराज सकपाळने कुर्ला स्थानकात रेल्वे रुळाला गेलेले तडे वेळीच पाहिल्यामुळे मोठा अपघात टळला.
चुनाभट्टीचा रहिवासी असलेला गुरुराज नेहमीप्रमाणे अंधेरीला ऑफिसला जाण्यासाठी कुर्ला स्थानकात ट्रेन बदलत होता. त्यावेळी ब्रिजवरुनच त्याने रुळाला तडे गेल्याचं पाहिलं. नेमकं त्याच क्षणी एक ट्रेन कुर्ला स्टेशन सोडण्याच्या तयारीत होती. ही ट्रेन निघाली असती, तर मोठा अनर्थ घडला असता. त्यामुळे गुरुराजने मोटरमनचं लक्ष त्याकडे वेधलं.
रेल्वे रुळाला किमान दोन इंचांचा तडा गेल्याचं पाहिल्याचं गुरुराज सांगतो. मोटरमन परमहंस गिरी यांनी ट्रॅकचं परीक्षण केलं असता फिशप्लेट्स ढिले झाल्याचं लक्षात आलं. गिरी यांनी तात्काळ कंट्रोल रुमला याची माहिती दिली. त्यानंतर अत्यंत कमी वेगाने लोकल या ट्रॅकवरुन नेण्यात आली.
जर हा प्रकार लक्षात आला नसता, तर रेल्वेच्या इतिहासात मोठी दुर्घटना घडली असती, अशी कबुली राष्ट्रीय रेल्वे कामगार संघटनेचे सचिव वेणू नायर यांनी दिली आहे. सकाळी 7.57 वाजता ही माहिती कंट्रोल रुमला दिल्यानंतर 15 मिनिटांत हा बिघाड दुरुस्त करण्यात आल्याचं सांगितलं जातं.