मुंबई: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी बनावट चकमकीत ठार मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदे याने पोलिसांकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांना स्वसंरक्षणार्थ त्याला मारावे लागले, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र, याप्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली असता अक्षयने ज्या रिव्हॉल्व्हरमधून पोलिसांवर गोळीबार केल्याचा दावा करण्यात आला होता, त्या बंदुकीवर अक्षयच्या बोटांचे ठसे आढळून आलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांचा आत्मसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद आहे. परिणामी गाडीतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनीच अक्षयला बनावट चकमकीत (Akshay Shinde Encounter) ठार मारले, हा अक्षयच्या आई-वडिलांचा दावा खरा आहे, असे चौकशी अहवालात म्हटले आहे. यामुळे अक्षय शिंदे एन्काऊंटरमधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी हा चौकशी अहवाल सादर करण्यात आला. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी या अहवालाचे वाचन केले. या अहवालात एन्काऊंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पोलिसांवर कारवाई होणार आहे. सर्वप्रथम पोलिसांवर अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत ठार मारल्याचा गुन्हा दाखल होईल. त्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांवर खटला चालवला जाईल. त्यामुळे आता याप्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस दल आणि राज्य सरकार काय पावले उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, या अहवालाची माहिती समोर आल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बदलापूरच्या घटनेमध्ये जो अहवाल न्यायालयात सादर केला. त्यावर न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्यांनी निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. जो कोणी दोषी असेल, जाणून बुजून एन्काऊंटर केला असेल तर न्यायालय निर्णय घे याबाबत शासन कुठलाही हस्तक्षेप करणार नाही, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.
मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं होतं?
अक्षय शिंदे याच्यावर बदलापूरच्या शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. 23 सप्टेंबरला त्याला तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेले जात होते. अक्षय शिंदे याला घेऊन जाणारी पोलिसांची गाडी मुंब्रा बायपासच्या परिसरात होती. त्यावेळी अक्षय शिंदे याने याने एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचली. त्याने निलेश मोरे यांच्यावर त्याने 3 गोळ्या फायर केल्या. यातील एक गोळी निलेश मोरेंच्या पायाला लागली आणि 2 गोळ्यांचा नेम चुकला. त्यावेळी गाडीतील इतर पोलीस अधिकाऱ्यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला. यामध्ये अक्षयच्या डोक्यात गोळी शिरली आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता.
आणखी वाचा