Ajit Ashatai Anantrao Pawar :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दालनाबाहेरील नावाची पाटी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा पहिला मान 'अजित आशाताई अनंतराव पवार' (Ajit Ashatai Anantrao Pawar) यांना मिळाला आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरील 'अजित आशाताई अनंतराव पवार' (Ajit Asha Tai Anantrao Pawar) नावाची पाटी कौतुकाचा विषय ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनाबाहेरील अजित पवार नाव बदलून आता त्या जागी अजित आशाताई अनंतराव पवार या नावाची पाटी लावण्यात आली आहे.


उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरील पाटी चर्चेत


राज्याचं चौथं महिला धोरण 8 मार्चला जागतिक महिला दिनाच्या दिवशी लागू करण्यात आलं. यानंतर पहिल्याच कार्यालयीन दिवशी मंत्रालयात 'अजित आशाताई अनंतराव पवार' नावाची पाटी झळकली. यंदा राज्य सरकारने जागतिक महिला दिनी म्हणजेच 8 मार्चला राज्याचं चौथं महिला धोरण जाहिर केलं. या चौथ्या महिला धोरणात शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचा मान उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजनमंत्री अजित पवार यांनी पटकावला. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील त्यांच्या दालनाबाहेर 'अजित आशाताई अनंतराव पवार' अशी पाटी सुटीनंतरच्या सोमवारी पहिल्याच कार्यालयीन दिवशी झळकली आहे.


अजित आशाताई अनंतराव पवार


मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यालये आहेत. त्यामुळे सहाव्या मजल्यावर येणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक असते. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर येणाऱ्यांसाठी ही पाटी आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय ठरली आहे. राज्याच्या महिला धोरणाची तात्काळ अंमलबजावणीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीचे सर्वांकडून कौतुक होत आहे. 


चौथ्या महिला धोरणाची अंमलबजावणी


8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी राज्याचं चौथे महिला धोरण लागू करण्यात आलं. त्यादिवशी महाशिवरात्रीची सुट्टी होती. त्यानंतर शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुटी आली. 8 मार्चनंतर सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर मंत्रालयात आलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांसाठी, उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरची 'अजित आशाताई अनंतराव पवार' ही पाटी आश्चर्याची आणि कौतुकाचा विषय ठरली, तसेच यातून उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या कृतीशील कार्यशैलीचा पुनर्प्रत्यय आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rohit Pawar : मराठा उमेदवारांचा फायदा भाजपला? निर्णय घेण्यापूर्वी विचार करा; रोहित पवारांचं मराठा समाजाला थेट आवाहन