मुंबई : भाजप नेते विनोद तावडे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत टीका केली आहे. विनोद तावडे विधानसभा सदस्य नाहीत. जी व्यक्ती विधानसभेचा सदस्य नाही, सभागृहाचा जो प्रमुख नेता होणार आहे, त्याला मत देऊ शकत नाही, असा नेता राज्यपालांशी भेटून चर्चा कशी करु शकतो, असं अजित पवारांनी म्हटलं.

सत्ता स्थापनेबाबत किंवा राज्यातील परिस्थितीबाबत राज्यपालांशी चर्चा करण्यासाठी शिवसेना-भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे यापैकी एखादा नेता आला असता तर आम्ही मान्य केलं असतं. कदाचित विनोत तावडे राज्यपालांना आपलं तिकीट का कापलं हे विचारायला आले असतील. तुम्ही (राज्यपाल) देखील भाजपमध्ये होता, मग माझं तिकीट का कापलं, याची माहिती तुम्हाला असेल, अशी विचारणा करण्यासाठी विनोद तावडेंनी राज्यपालांची भेट घेतली असावी, असा टोला अजित पवारांनी लगावला.



मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच विनोद तावडे यांनी विरोधी पक्षाचे नेते यायच्या आधी राज्यपालांची भेट घेतली. सत्तास्थापनेच्या विविध पर्यायांबाबत दोघांमध्ये चर्चा झाली, अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र ही राजकीय भेट नव्हती, शिक्षणाबाबत काम होतं. राज्यपालांनी मला भेटायला बोलवलं आणि मी भेटलो, असं विनोद तावडेंनी सांगितलं.