मुंबई : बांगलादेशी नागरिकांना मुंबईत आल्यानंतर त्यांचं बोगस आधारकार्ड आणि पासपोर्ट बनवून देण्याच्या सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या दलालांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्यांना स्थानिक पातळीवरची कागदपत्रे बनवण्यासाठी एमआयएमच्या दोन आमदारांच्या लेटर हेडचा वापर करण्यात आला आहे. साकीनाका परिसरातून दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांचा मोबाईल तपासला असता ते बांग्लादेशी नागरिक असल्याचे पुरावे मिळाले.


तपासादरम्यान पोलिसांना या बांगलादेशी नागरिकांनी स्थानिक पातळीवरील कागदपत्रे बनवण्यासाठी एमआयएमच्या दोन आमदारांच्या लेटर हेडचा वापर केला होता, अशी माहिती समोर आली आहे. एमआयएमच्या दोन आमदारांसह एकूण सात आमदारांची पत्र तपासादरम्यान सापडली आहेत. त्या लेटरवर आमदार मुफ्ती मुहम्मद इस्माईल अब्दुल खालीख आणि आमदार शेख असिफ शेख रशीद यांची नावे आहेत. आता ही पत्र लेटर या आमदारांनीच दिली होती की ती ही बनावट आहेत याचा तपासही मुंबई पोलिस करत आहेत.



दरम्यान, बोगस पासपोर्ट बनवणारे बोगस लेटरहेडही बनवू शकतात, अशी प्रतिक्रिया एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती मुहम्मद इस्माईल अब्दुल खालीख यांनी दिली आहे.



तसंच बांगलादेशी नागरिकांनी त्यांच्या मोबाईलमधून वेगवेगळ्या ॲपद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबातील बांगलादेश इथे राहणाऱ्या लोकांशी संवाद साधल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पासपोर्ट अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांची चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की, "मुंबईमधील एजंट त्यांना मुंबईमध्ये आल्यावर राहण्याची आणि जेवणाची सुविधा उपलब्ध करत असे. त्यानंतर इथे राहण्यासाठी भारताची ओळखपत्रे मिळवण्यासाठीही एजंटने मदत केली होती.



यानंतर पोलिसांनी मुंबईमधील एजंटला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता एजंटकडे बांगलादेशी नागरिकाचा एक भारतीय पासपोर्ट मिळाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करुन चौकशी केली. त्याने सांगितलं की, "तो बांगलादेशी नागरिकांचे आधार कार्ड आणि पासपोर्ट मालेगावातील एजंटकडून बनवून घेत असे. या माहितीवरुन पोलिसांनी मालेगावमधील एजंटला ताब्यात घेतले. त्याकडेही बांगलादेशी नागरिकाचा एक भारतीय पासपोर्ट मिळाला. त्यानंतर पोलिसांनी या एजंटच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात भारतीय ओळखपत्रे वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने मिळून आली. त्यामधील ओळखपत्रांची पोलिसांकडून पडताळणी चालू असून ते किती खरे आणि किती खोटे याबाबत पोलिसांचा तपास करत आहेत. तसेच एजंट लोकांना आधार कार्ड बनवण्यासाठी कोण मदत करत आहे याचाही शोध साकीनाका पोलीस करत आहेत."



155 आधार कार्ड, 34 पासपोर्ट, 28 पॅन कार्ड, 8 रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, 187 बँक आणि पोस्टाचे पासबुक, 19 रबर स्टॅम्प आणि 29 शाळा सोडल्याचे दाखले ही बनावट आणि इथल्या एजंटने बनवलेली धक्कादायक कागदपत्रे सापडली आहेत.