मुंबई : कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या मुंबईत आता कोरोना चाचणी मोफत होणार आहे. मुंबई महापालिकेकडून आजपासून 244 ठिकाणी मोफत कोरोना चाचणीची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे असल्यास नागरिक महापालिकेच्या हेल्पलाईनवर किंवा 1916 या क्रमांकावर संपर्क साधून जवळच्या केंद्राची माहिती घेऊन तिथे मोफत कोरोनाची चाचणी करु शकतात.
मुंबईत आतापर्यंत केवळ 54 ठिकाणी कोरोनाची चाचणी केली जात होती. मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येणारे येणारे विविध दवाखाने, रुग्णालयांसह एकूण 244 ठिकाणी आजपासून मोफत वैद्यकीय चाचणी होणार आहे. त्यामुळे मोफत कोरोना चाचणीच्या ठिकाणींची संख्या वाढून जवळपास 300 होणार आहे. काही ठिकाणी आरटीपीसीआर पद्धतीची वैद्यकीय चाचणी; तर उर्वरित ठिकाणी अॅंटीजेन (Antigen) आधारित वैद्यकीय चाचणी उपलब्ध असणार आहे.
कोरोना चाचणी झाली आणखी स्वस्त! काय आहेत नवीन दर?
या 244 ठिकाणांची माहिती http://stopcoronavirus.mcgm.gov.in या वेबसाईटवरुन आणि विभागीय हेल्पलाईनद्वारे किंवा 1926 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोविडची लक्षणे असल्यास वरील क्रमांकावर संपर्क साधून मुंबईकरांना आपल्या घराजवळच मोफत कोरोना चाचणी करता येणार आहे. सुरुवातीला दररोज सकाळी 10 ते 12 या कालावधीदरम्यान या 244 ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा 'वॉक इन' पद्धतीने उपलब्ध असणार आहे.
महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या 244 ठिकाणांव्यतिरिक्त महापालिका क्षेत्रातील 54 खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्येही या आधीपासूनच कोरोना चाचणी मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील कोविड विषयक वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध असणाऱ्या ठिकाणांची एकूण संख्या ही 300 पेक्षा अधिक झाली आहे.
खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचणीच्या दरात कपात
कोरोनाची चाचणी आता आणखी स्वस्त झाली आहे. खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचणीत 200 रुपयांची कपात करण्यात आली आहे. कोरोनाच्या चाचणीसाठी आता जास्तीत जास्त अठराशे रुपये मोजावे लागणार आहे. कोरोना चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत स्वॅब दिल्यास 980 रुपये आकारले जाणार आहेत. कोविड केअर सेंटर्स, हॉस्पिटल, क्लिनिक, क्वॉरंटाईन सेंटर्समध्ये स्वॅब दिल्यास 1400 रुपये आकारले जाणार आहेत. तर घरी येऊन स्वॅब घेतल्यास 1800 रुपये आकारले जाणार आहेत. या नव्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 26 ऑक्टोबर रोजी ट्वीट करुन ही माहिती दिली होती.
Free COVID-19 Test | मुंबईत आजपासून 244 ठिकाणी कोरोनाची मोफत चाचणी; BMCचं मोठं पाऊल