नवी मुंबई : मुंबईनंतर आता नवी मुंबईतही बोगस लसीकरण झाले असल्याची घटना समोर आली असून मुंबई आणि नवी मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरणाच्या दोन्ही घटनेतील आरोपी एकच आहेत. तुर्भे एमआयडीसी मध्ये असलेल्या ॲटोंबर टेक्नॉलॉजी कंपनीत एप्रिल महिन्यात 352 कामगारांचे लसीकरण करण्यात आले होते. मुख्य आरोपी डॉ मनीष त्रिपाठी याने केसीईपी हेल्थ केअरच्या नावाने कॅम्प घेत कंपनीतील सर्व कामगारांचे लसीकरण केले होते. यासाठी त्यांनी कंपनीकडून 4 लाख 24 हजार रूपये बिल आकारले. लसीकरणानंतर आरोपीने अनेक दिवस सर्टीफिकेट न दिल्याने कंपनी व्यवस्थापणाने याबाबत तगादा लावला होता.


अखेर दोन कामगारांचे सर्टीफिकेट देत त्यावर लिलावती हॉस्पिटलचा उल्लेख असल्याने ॲंटोबर टेक्नोलॉजी कंपनी व्यवस्थापनाला यात काळेबेरे असल्याचा संशय आला. यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करून तपास केला असता कामगारांचे केलेले लसीकरण बोगस असल्याचे तपासात समोर आले. आरोपी डाॅ मनीष त्रिपाठी, करीम आणि अन्य एक साथीदार या तिघांवर विविध कलमांव्दारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन आरोपी मुंबई पोलिसांच्या कस्टडीमध्ये असून यातील तिसरा आरोपी अद्याप फरार आहे.


आरोपी डॉ. मनिष त्रिपाठीचं आत्मसमर्पण


काही दिवसांपूर्वी मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरण समोर आलं होतं. याप्रकरणी मुंबई महापालिकेनंही बोगस लसीकरण झाल्याचं मान्य केलं होतं. याप्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. मनिष त्रिपाठीनं पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यानंतर त्रिपाठी यांनी पोलिसांमध्ये आत्मसमर्पण केलं होतं. मुंबईत उघडकीस आलेल्या बोगस लसीकरण प्रकरणातील लसी डॉ. मनिष त्रिपाठी यांनी पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.  सध्या तो मुंबई पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे.


Mumbai Fake Vaccination : मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. मनिष त्रिपाठींचं आत्मसमर्पण


कोरोनापासून बचाव करण्यासाठी सध्या लसीकरण हाच एक पर्याय आहे. मात्र याचासुद्धा फायदा घेऊन लोकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात मुंबईत केली जात होती. शहरात विविध ठिकाणी बोगस लसीकरण शिबिर आयोजित करून फसवणूक करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. या प्रकरणी मुंबईच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये सात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर या प्रकरणी आता मुंबई पोलिसांकडून एसआयटी सुद्धा नेमण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे पूर्ण विश्व त्रस्त आहे अजूनही यावर उपचार सापडला नाही. मात्र लसीकरण केल्यामुळे या जीवघेण्या आजाराला लांब ठेवण्यास मोठी मदत होत आहे. मात्र आता काही लसीकरण याच्या नावावर सुद्धा पैसे कमवून लोकांच्या जीवाशी खेळत आहेत.


मुंबईत दोन हजार 53 जणांचं बोगस लसीकरण झाल्याची पालिकेकडून कबुली


बनावट लसीकरणाच्या माध्यमातून एकूण दोन हजार 53 नागरिकांना फसवण्यात आल्याची माहिती पालिकेनं हायकोर्टासमोर मांडली होती. एकाच टोळीनं कांदिवली, बोरिवली, वर्सोवा, खार अशा पश्चिम उपनगरांतील वेगवेगळ्या ठिकाणी ही बनावट लसीकरणाची खाजगी शिबिरं घेण्यात आली होती. बोगस लसीकरण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा, आरोपींवर कठोर करवाई करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.