पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा असल्याची टीका केलीय. बिहार निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार राऊत यांनी ही टीका केली आहे. बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाकडून बिहार मधील नागरिकांना मोफत लस देण्याचे आश्वासन देण्यात आले. भाजपच्या या आश्वासनाच्या विरोधात विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती आणि भाजप वर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली आणि भारतीय जनता पक्षाने दिलेले मोफत आश्वासन हे आयडियल कोड ऑफ कण्डक्टचे उल्लंघन नसल्याचं म्हटलं. यावरती प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा असल्याचं म्हटलंय.


काँग्रेसच्या मजबूत पाठिंब्यावर महाविकास आघाडीचे सरकार उभा


खासदार संजय राऊत हे पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापासाठी पुण्यात आले होते. राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार हे स्थिर असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचं वक्तव्य परभणी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलं आहे. त्याबद्दल खासदार संजय राऊत यांना विचारलं असता नांदेड महापालिकेचा विषय असेल तर स्वतः मुख्यमंत्री त्यामध्ये लक्ष घालतील असं म्हटलं आणि काँग्रेसच्या मजबूत पाठिंब्यावर महाविकास आघाडीचे सरकार उभा असल्याचं सांगितलं.


त्याच बरोबर बारा विधानपरिषदेच्या जागांसाठी उमेदवारांची यादी कोणती आहे याबद्दलही संजय राऊत यांना विचारला असता माध्यमांमधूनच वेगवेगळ्या नावांची चर्चा होत असल्याचं आणि प्रत्येक न्यूज चॅनेलकडून एक वेगळी यादी दाखवली जात असल्याचं म्हटलं. ऊर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेने ऑफर दिली आहे का याबद्दल स्पष्ट बोलण्याचं संजय राऊत यांनी टाळलं, मात्र मुख्यमंत्री जर कोणाशी बोलणं करत असतील तर ती बाब गुप्त राहते, त्याची अशी सार्वजनिक चर्चा होत नाही असं त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर शिवसेनेमध्ये वर्षानुवर्ष काम करणाऱ्या शिवसैनिकांना बाजूला ठेवून नव्याने पक्षात आलेल्यांना संधी मिळत असल्याबद्दल ही संजय राऊत यांना पत्रकारांनी छेडलं. प्रियंका चतुर्वेदी या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत तर आता उर्मिला मातोंडकर यांचं नाव शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी घेतले जातंय. राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री असलेले शंकरराव गडाख हे अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत तर दुसरे मंत्री राजेंद्र यड्रावकर हे देखील अपक्ष म्हणून निवडून आले आहेत या दोन अपक्षांना अनुक्रमे अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचा पाया भक्कम करण्यासाठी मंत्रीपद देण्यात आले. सत्ता महत्त्वाची असते आणि त्यासाठी अशा लोकांना पक्षात सामावून घ्यावं लागतं असं संजय राऊत म्हणाले. या दोघांनाही निवडून येण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला होता असंही त्यांनी सांगितलं मूळ शिवसैनिक आणि नवीन शिवसैनिक असं काही नाही सगळे शिवसैनिकच आहे असेही संजय राऊत यांनी म्हटलंय.


शरद पवार प्रेम करावे असेच व्यक्तिमत्त्व
शरद पवार सरकार चालवतात या चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांवर बोलताना राऊत म्हणाले की, शरद पवार हे आजच्या घडीला देशातील प्रमुख, अनुभवी आणि संयमी नेते आहेत. शरद पवारांनी सरकारला सल्ला दिला तर पोटात काय दुखतं? असा सवाल त्यांनी केला. शरद पवार प्रेम करावे असेच व्यक्तीमत्त्व आहे, असंही ते म्हणाले.


आरक्षणाच्या वादावर मोदींनी लक्ष घालायला हवं असंही ते म्हणाले. दोन्ही राजांनी पुढाकार घेऊन पंतप्रधान मोदींच्या दरबारात विषय न्यावा, आम्हीही पाठिंबा देऊ, असं ते म्हणाले.


राजभवन ही राजकारण करण्याची जागा नाही
राजभवन ही राजकारण करण्याची जागा नाही. राजभवन ही घटनात्मक जागा, त्याची प्रतिष्ठा राखली जावी. राज्यपालांनी पवार यांच्याकडे पाठवण्याऐवजी पंतप्रधानांकडे पाठवावे. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असं ते म्हणाले.