मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुंबई काँग्रेस अध्यक्ष लवकरच बदलण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष यावेळी मराठी असेल की अमराठी याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष मराठी आणि मराठा समाजातील करायचा असेल तर काँग्रेसपुढे भाई जगताप आणि मधु चव्हाण हे पर्याय आहेत. तर या दोघांसह अमराठी डॉ.सुरेश शेट्टी,  चरणसिंह सप्रा यांचीही नावं चर्चेत आहेत.


लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावं लागल्यामुळे काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती केली होती. आता मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुंबई काँग्रेस अध्यक्ष लवकरच बदलला जावू शकतो. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी ही चार नावं चर्चेत आहेत.


भाई जगताप
विधान परिषदेतील आमदार भाई जगताप यांचं नाव मुंबई अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. त्यांची ही आमदारकीची दुसरी टर्म आहे.  याआधी विधान सभेत ही ते निवडून गेले होते. सध्या मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष ही जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांची मुंबईतील महानगर टेलीफोन कामगार संघटना देखील आहे. तसंच त्यांच्याकडं कोकण म्हाडाचे अध्यक्ष पदाची जबाबदारी होती. ते मिलिंद देवरा गटाचे नेते मानले जातात. त्यांनी ट्विटर वरून माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर ट्विटरवरून थेट टीका केली होती


मधू चव्हाण
मधू चव्हाण हे मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. ते भायखळा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आहेत. मिलिंद देवरा गटातील नेता अशी त्यांचीही ओळख आहे. त्यांनी आघाडी सरकार असताना म्हाडाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. सातत्यानं ते काँग्रेसची बाजू मांडत असतात.


डॉ.सुरेश शेट्टी
अंधेरी पूर्व मतदार संघाचे प्रतिनिधित्व डॉ.सुरेश शेट्टी यांनी केले आहे. ते माजी कॅबिनेट मंत्री आहेत. विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले नेते अशी त्यांनी ओळख आहे.


चरण सिंह सप्रा
मुंबई काँग्रेसचा अमराठी चेहरा असलेले चरण सिंह सप्रा यांनी विधान परिषदेवर आमदार म्हणून काम केले आहे. मुंबईतील विविध समस्यांसाठी केलेल्या आंदोलनात ते आघाडीवर असतात.  मुंबईतील पीएमसी बँकेतील खातेदाराच्या प्रश्न सतत लावून धरला. मुंबई काँग्रेसचा पंजाबी चेहरा अशीही त्यांची ओळख आहे.