मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्याबाबत होकार कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोनवरुन संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नुकतंच कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात झालेल्या संघर्षात उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाला चांगलंच फैलावर घेतलं होतं.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर वेगवेगळ्या स्तरातून सरकारवर आरोप प्रत्यारोप होत होते. सुशांत सिंहने आत्महत्या केल्यानंतर कंगना रनौत हिने आधी सिनेसृष्टी आणि मग मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकार आणि थेट मुख्यमंत्र्यांवर एकेरी शब्दात हल्ला चढवला. त्यावेळी सिनेसृष्टीतून कोणी बोलत नव्हतं. पण उर्मिला मातोंडकर यांनी मात्र प्रसारमाध्यमातून कंगना रनौत हिच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. महाराष्ट्र ते मुंबई पोलीस यांचा बचाव उर्मिलाने करत बॅकफूटवर गेलेल्या महाविकास आघाडीला दिलासा दिला.
उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेसाठी उमेदवारी?
राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील जागांवर चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्रेसने सगळ्यात आधी उर्मिला मातोंडकर यांना संपर्क केला. त्यांनी विधान परिषदेवर यावं यासाठी बाळासाहेब थोरात यांनी विचारणा केली. पण उर्मिला मातोंडकर यांनी ती ऑफर नाकारली. पुन्हा राजकारणात नको अशी भूमिका घेतली. उर्मिला नाही म्हटलं ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळली. तेव्हा त्यांनी बाळासाहेब थोरात यांना मी उर्मिलाशी बोलून बघतो असा प्रस्ताव मांडला. त्यानुसार उद्धव ठाकरे स्वतः उर्मिला यांच्याशी बोलले. उर्मिला यांनी या प्रस्तावबाबत विचार केला आणि अखेरीस शिवसेनेला होकार कळवला. आणि त्यामुळेच काँग्रेसमधून लोकसभा निवडणूक लढवलेली उर्मिला आता शिवसेनेच्या अंगणात जाणार आहे.
कंगना रनौतने चढवलेल्या हल्ल्यानंतर सिनेसृष्टीतील मराठी आणि वैचारिक बैठक असलेला एक चेहरा महाविकास आघाडीला उर्मिलाच्या माध्यमातून मिळाला. तो आपल्याबरोबर जोडला जावा म्हणून काँग्रेस आणि शिवसेना दोघांनी प्रयत्न केले. अखेरीस उर्मिलाने शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार दिला.