मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपचा उल्लेख काढून टाकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, आज केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये पंकजा मुंडे यांनी भाजपचा उल्लेख केला आहे. त्यामुळं पंकजा मुंडे यांच्या मनात नेमकं काय सुरुय याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. 1 डिसेंबरला लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये आपण 12 डिसेंबरला म्हणजे भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिवशी आपला पुढची वाटचाल ठरवणार असल्याचे सांगितले आहे. तर, पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
भारताचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करणारी पोस्टी पंकजा मुंडे यांनी केली आहे. यामध्ये भाजपचे कमळाचे चिन्ह दिसत आहे. याआधी पंकजा मुंडेंच्या प्रोफाईलचं यूजरनेम पंकजा मुंडे, भाजप असं होतं. पण आता ट्वीटरवर पेजवर फक्त पंकजा मुंडे असं लिहलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याची सध्या चर्चा आहे. खरंतर, पंकजा मुंडे सध्या अस्वस्थ आहेत. यातच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्याने राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाली.
पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट -
विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. परळी मतदारसंघात त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. पंकजा सध्या कोणत्याही सभागृहाच्या प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे कदाचित त्यांनी भाजपचा उल्लेख काढला असवा असं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदेही यांनीही त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन अशाचप्रकारे उल्लेख काढला होता. तेव्हाही अशीच चर्चा रंगली होती.
पंकजा मुंडेंबाबत 12 डिसेंबरलाच कळेल : संजय राऊत
पंकजा मुंडेच काय, तर राज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय, पंकजा मुंडेंबाबत 12 डिसेंबरलाच कळेल, असंही राऊतांनी स्पष्ट केलं. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्ट आणि ट्वीटर हॅण्डलवर भाजपचा उल्लेख नसल्याने त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही : चंद्रकांत पाटील
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पक्ष बदलाच्या चर्चांमध्ये कुठलंही तथ्य नाही. त्या कायम भाजपसोबतच राहणार आहेत, असं स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. पंकजा मुंडे यांच्याबाबत या अफवा आणि बातम्या थांबवाव्यात असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. तर मुंडे-महाजन आणि ठाकरे कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मात्र त्यामुळे पंकजा भाजप सोडणार नाहीत, असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संबंधित बातम्या :
- पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही : चंद्रकांत पाटील
- पंकजा मुंडेच काय राज्यातील अनेक मोठे नेते संपर्कात : संजय राऊत
Majha Vishesh | माझा विशेष | सध्याच्या सत्तापेचादरम्यान पंकजा गप्प का होत्या?