मुंबई : मराठी चित्रपट क्षेत्रातील विनोदवीर अभिनेता भाऊ कदम आज चक्क मुंबईतील रस्त्यांवर सफाई कामगारांच्या रूपात स्वच्छता करताना दिसून आला. यामुळे काही वेळ नागरिक चकित झाले, मात्र भाऊने ही स्वच्छता चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने केली आहे.

दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.  हा उत्सव फटाक्यांच्या आतषबाजींशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.  ध्वनी आणि वायू प्रदूषणाला आमंत्रण देणाऱ्या या फटाक्यांचा कचरा दिवसागणिक वाढत चालला आहे. मात्र, या कचऱ्याकडे सहजपणे कानाडोळा केला जातो. परिसर अस्वच्छ करणारा हा कचरा त्वरित उचलणे गरजेचं आहे.   बांद्रा येथील निवासी वसाहतीमध्ये 'नशिबवान' या आगामी चित्रपटाच्या टीमने स्वच्छता मोहिम राबवली.

लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि अमोल वसंत गोळे दिग्दर्शित या सिनेमात प्रमुख भूमिकेत असलेल्या भाऊ कदमचा देखील या मोहिमेत मोलाचा हातभार लाभला. दिवाळीच्या उत्तरार्धात म्हणजेच भाऊबिजेच्या मुहूर्तावर राबविण्यात आलेल्या या मोहिमेसाठी स्थानिकांचा देखील उत्तम प्रतिसाद लाभला.

उदय प्रकाश लिखित 'दिल्ली की दीवार' या कथेवर आधारित असलेल्या 'नशीबवान' या सिनेमात भाऊ कदम एका स्वच्छता कामगाराच्या भूमिकेत झळकणार असून ११ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे शिवाय, त्याच्यासोबत मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी देखिल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'नशीबवान' या सिनेमाचे अमित नरेश पाटील,विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील हे निर्माते असून, प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्याची भूमिका बजावली आहे.