पालघर : डहाणू आणि वाणगाव रेल्वे स्टेशनदरम्यान मालगाडीच्या दोन डब्ब्यांना आग लागल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या आगीचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला असून मुंबई-गुजरातदरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या धीम्या गतीने सुरु आहे.


कौंनराज नावाच्या मालगाडीला गुरुवारी (8 नोव्हेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागल्याने दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सुरतकडून जेएनपीटीला जाणाऱ्या मालगाडीच्या दोन डब्ब्यांना वाणगाव-डहाणू रेल्वे स्टेशनदरम्यान असलेल्या पाले दांडीपाडासमोर आग लागली. ओव्हरहेड वायर तुटल्याने मालगाडीच्या ऑईल असलेल्या डब्ब्यांना आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

रेल्वे मुख्य प्रबंधक, टेक्निकल टीम तसंच कर्मचारी घटनास्थळी दाखल होत वेळीच आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु ओव्हरहेड वायर आणि रुळाचं नुकसान झाल्याने डहाणू-विरार मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

तर मुंबईहून गुजरातकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. सौराष्ट्र मेल रवाना करण्यात आली आहे. तर गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्याच्या गाड्या डहाणू पलिकडील रेल्वे स्थानकांवर रोखण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत. तसंच वसई रोड-बोईसर, बोईसर-वसई रोड, डहाणू-पनवेल, तसंच सुरत वांद्रे, विरार-वलसाड या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेने ट्विटरवर दिली.