मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून काल रात्री स्वतः जाहीर केली आहे. त्यानंतर आज ऐश्ववर्या बच्चन आणि आराध्या बच्चन यांची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांचा बंगला ज्या परिसरात आहे, तो बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के/पश्चिम विभाग कार्यालय हद्दीतील जुहू भागात राहात असलेल्या भागातील चारही बंगले आज महानगरपालिकेने प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेन्मेंट) म्हणून घोषित केले आहेत.अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानी महापालिकेकडून निर्जंतुकीकरण करून बंगल्यातील सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी (स्क्रीनिंग) तसेच अन्य तपासण्या पूर्ण केली आहे.


अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यानंतर महानगरपालिकेच्या के/पश्चिम कार्यालयाकडून आज सकाळी बच्चन कुटुंबियांच्या चारही बंगल्यावर निर्जंतुकीकरण करण्यासाठी विभाग कार्यालयाचे कर्मचारी दाखल झाले. चारही बंगले निर्जंतुकीकरण करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमले होते. तसेच वैद्यकीय पथकही चारही बंगल्यावर नियुक्त करून बंगल्यावरील कर्मचाऱ्यांची तपासणी (स्क्रीनिंग) करण्यात आली. तसेच सुमारे 30 कर्मचाऱ्यांची तपासणी करून चाचणी करण्यात आली आहे.


ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या यांनाही कोरोनाची लागण


बच्चन कुटुंबीयांचे जलसा, प्रतीक्षा, जनक आणि वत्सा ही चार बंगले कोविड संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून ते सीलबंद करण्यात आले आहेत. बच्चन कुटुंबीय व संबंधित कर्मचारी यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे तपशील संकलित करणे, संपर्कात असलेल्या व्यक्तींना अलगीकरण राहण्याचे निर्देश देणे आदी सर्व कार्यवाही विहित प्रक्रियेनुसार सुरू आहे. जलसा या बंगल्यावर तेथील कर्मचाऱ्यांना अलगीकरण करण्याची व्यवस्था असून तेथे पुरेशी जागाही आहे. यासाठी पालिकेकडून आवश्यक ती मदत केली जाणार आहे.


संबंधित बातम्या