मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी योग्यरित्या तपास केला आहे. मात्र काही वृत्त वाहिन्यांनी बेजबाबदार पत्रकारिता केली आणि मुंबई पोलिसांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. तसेच सोशल मीडियावर हजारो फेक अकाउंट्स बनवून पोलिसांची बदनामी करण्यात आल्याचंही सिंह यांनी म्हटलं आहे. तसेच अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचंही एबीपी माझाला दिलेल्या एक्ल्युझिव्ह मुलाखतीत त्यांनी सांगितलं.


सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात घडलेल्या सर्व घडामोडी आणि त्यानंतर समोर आलेला एम्सचा अहवाल यासंदर्भात बोलताना मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, मुंबई पोलीस आणि शिवसेनेने एम्सच्या डॉक्टरांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. यासंदर्भात बोलताना मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह म्हणाले की, 'सुशांत सिंह प्रकरणी मुंबई पोलीस प्रोफेशनल पद्धतीने तपास करत होते. हे आत्महत्येचंचं प्रकरण होतं. त्यांनी सांगितलं की, मुंबई पोलिसांनी 60-65 दिवसांसाठी इमानदारीने कसून तपास केला. 14 जून रोजी सुशांतचा मृत्यू झाला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्याचे वडिल आणि बहिणींचा जबाब नोंदवला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या जबाबात म्हटलं होतं की, ही आत्महत्याच आहे.'


'सुशांत सिंह प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास योग्य झालेला आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी मुंबई पोलिसांना सुरुवातीच्या स्टेटमेंटमध्ये सुशांतने आत्महत्या केल्याचं सांगितलं होतं. परंतु, बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर याप्रकरणाला वेगळं वळण मिळालं. तसेच सुशांतच्या कुटुंबियांनी वेळोवेळी मागितलेल्या मदतीला मुंबई पोलिसांनी संपूर्ण सहकार्य केलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सहकार्य केलं नाही हा आरोप चुकीचा आहे.' मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्ल्युझिव्ह मुलाखतीत बोलताना सांगितलं.


मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह पुढे बोलताना म्हणाले की, 'सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज घ्यायचा, हे आमच्याही तपासात आलं होतं, परंतु त्यासंदर्भातील खुलासा कुठेही केला नाही. तसेच डिप्रेशनबाबत त्याची बहिणचं त्याला औषध देत असल्याचं तिनं सांगितलं होतं. सध्या त्या अनुषंगानं तपास सुरु असल्याचंही सिंह यांनी सांगितलं.


परमबीर सिंह म्हणाले की, 'आम्ही सुशांतच्या कुटुंबियांना पुढील तपासासाठी बोलावलं परंतु, त्यानी सहकार्य केलं नाही. परंतु, त्यानंतर जेव्हा त्यांना इतर काम जसं प्रॉपर्टी आणि फ्लॅट रिलीज करण्याच्या कामात मदत पाहिजे होती, त्यावेळी आम्ही त्यांना पूर्ण मदत केली. अचानक 40-45 दिवसांनी बिहारमध्ये त्यांनी एफआयआर दाखल केला. तिथेही त्यांनी आत्महत्येचाच गुन्हा दाखल केला, ज्यासाठी त्यांनी इतर लोक जबाबदार असल्याचं सांगितलं होतं.'


पाहा व्हिडीओ : सुशांत प्रकरणी आमचा तपास खरा होता हे सिद्ध झालं : मुंबई पोलीस आयुक्त



सीबीआयलाही मुंबई पोलिसांनी केलं सहकार्य


परमबीर सिंह म्हणाले की, 'सुशांतच्या कुटुंबियांनी गुन्हा दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या हद्दीत अथॉरिटी नसतानाही तपास सुरु केला. तसेच मुंबई पोलिसांनी सहकार्य न केल्याचे खोटे आरोप लावले. खरं तर सहकार्य तेव्हा केलं असतं, ज्यावेळी त्यांना इथे तपास करण्याचे अधिकार असते. सुप्रीम कोर्टाने जेव्हा बिहार पोलिसांचा तपास सीबीआयला सोपावला, तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत पूर्णपणे सहकार्य केलं. तसेच पूर्ण तपास आणि सर्वांचे जबाब त्यांना सोपावले.'


दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एम्सच्या डॉक्टरांच्या पॅनलने काही दिवसांपूर्वी आपला अहवाल सीबीआयकडे सोपावला होता. या अहवालात सुशांत सिंह राजपूतची हत्या नसून आत्महत्याच असल्याचं सांगण्यात आलं होतं. एम्सच्या डॉक्टरांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, या अहवालासंदर्भात सीबीआय कायदेशीर पद्धतीने तपास करणार आहे. परंतु, एम्सच्या अहवालासंदर्भात सर्वांना समजल्यानंतर सुशांतचं कुटुंब, वकील आणि फॅन्सनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच एम्सच्या अहवालासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :