विमानतळाच्या परिसरात प्रवेश करणाऱ्या वाहनांकडून जीव्हीके कंपनीने मागील काही दिवसांपासून 130 रुपये टोल आकारणी सुरु केली होती. ही बातमी 'एबीपी माझा'नं दाखवल्यानंतर शिवसेनेनं आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात मंगळवारी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आंदोलन केलं.
मुंबई विमानतळावर एन्ट्री फीच्या नावाखाली सुरु असलेल्या लुटी प्रकरणी मनसेनं जीव्हीकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र गु्न्हा निष्पन्न होत नसल्याचं कारण पुढे करत जीव्हीकेविरोधात कोणताही गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही, असं लेखी उत्तर मुंबई पोलिसांनी दिलं होतं.
मुंबई विमानतळावर फक्त तुमच्या वाहनानं प्रवेश केला तरी 130 रुपये एन्ट्री फी आकारली जात होती. मुंबई विमानतळ अतिसंवेदनशील आहे. वाहनांच्या गर्दीमुळेच खासगी वगळता इतर वाहनांवर एंट्री टोल घेतला जातो, असं या आरोपांवर एअरपोर्ट ऑपरटिंग कंपनी GVK ने म्हटलं होतं.
एअरपोर्ट ऑथरिटी आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या करारानुसार टोल दर ठरवण्याचे सर्वस्वी
अधिकार GVK कडे आहेत. प्रवाशांसाठी खास एलिव्हेटेड रोड बांधला गेला आहे. त्याच्या सेवेसाठी हजारो कर्मचारी असतात. एंट्री फीचा पैसा या सर्व देखभालीसाठी दिला जातो, असं GVK तर्फे सांगितलं गेलं होतं.
2014 साली 'माझा'च्याच बातमीनंतर सर्वपक्षीय आंदोलन होऊन ही टोलधाड बंद झाली होती. मात्र त्याच्या पुढच्याच वर्षी 20 रुपये वाढीव दरानं ती पुन्हा सुरु झाली. अखेर 'एबीपी माझा'ने आवाज उठवल्यानंतर पुन्हा ही टोलवसुली बंद करण्यात आली आहे.