मुंबई : एबीपी माझाच्या ब्लॉग माझा स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले. या स्पर्धेला भरभरुन प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत प्रथम पुरस्कार यशोधन जोशी आणि कौस्तुभ मुद्गल यांना, द्वितीय अनिल गोविलकर, तर तृतीय क्रमांक नितीन साळुंखे, अमोल कुलकर्णी यांना मिळाला आहे. आज एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र या कार्यक्रमात या पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेसाठी कवी, साहित्यिक बालाजी सुतार तसेच लेखक ह्रषिकेश गुप्ते यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
विजेत्यांच्या ब्लॉग बद्दल
प्रथम पुरस्कार : यशोधन जोशी आणि कौस्तुभ मुद्गल : Dhaandola नावाचा ब्लॉग... https://dhaandola.co.in ही त्यांच्या ब्लॉगची लिंक आहे. या ब्लॉगमध्ये विविध विषयांवरच्या विशेषत: जुन्या पुस्तकांबद्दल लेख आहेत. अतिशय उत्तम भाषेत आणि वाचनीय शैलीतले माहितीपूर्ण लेख देण्यात आले आहेत.
द्वितीय पुरस्कार : अनिल मुकुंद गोविलकर : www.govilkaranil.blogspot.com ही त्यांच्या ब्लॉगची लिंक आहे. हिंदी मराठी चित्रपटांतली गाणी, अभिजात संगीत, गायक आणि संगीतकारांवर लिहिलेले रसास्वादपर लेख दिले आहेत.. उत्तम भाषा, वर्ण्यविषयाची उत्तम जाण, आणि वाचनीय शैलीतील विवेचन करण्यात आलं आहे.
तृतीय पुरस्कार : अमोल कुलकर्णी : विज्ञानयात्री koolamol.wordpress.com ही त्यांच्या ब्लॉगची लिंक आहे. यात कोरोनाविषयक माहितीपर लेख चांगले आहेत.
तृतीय पुरस्कार : नितीन साळुंखे nitinsalunkheblog.wordpress.com ही त्यांच्या ब्लॉगची लिंक आहे. वाचनीय लेख. सुंदर भाषा. विशेषत: मुंबईतील वेगवेगळ्या भागांचा इतिहास सांगणारे लेख उत्कृष्ट आहेत.
मीम स्पर्धेचे देखील निकाल जाहीर
तर यंदा पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या मीम स्पर्धेचे देखील निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार अनिकेत मेढेकर यांना तर द्वितीय पुरस्कार ऋतुजा पाटील यांना मिळाला आहे. तर तृतीय पुरस्कार फैजल खान आणि क्षितीज वर्मा यांना देण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रसिद्ध व्यंगचित्रकार चिंटूचे निर्माते चारुहास पंडित, आणि महाराष्ट्र टाईम्सचे सहाय्यक संपादक तथा तिरकस राजकीय लेखनासाठी प्रसिद्ध श्रीकांत बोजेवार यांनी काम पाहिले.